ज्ञानेश महाराव यांना अटक करण्याची जोरदार मागणी

0
5

पनवेल: लेखक ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर वाशी येथे आयोजित संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात अश्लाघ्य टीका केली होती, त्यामुळे आज पनवेलमध्ये ज्ञानेश महाराव यांचा हिंदू संघटनांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला तसेच पोलीसांनी महाराव यांना अटक करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
या निषेध आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शिवसेनेचे पनवेल शहर जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, युवा नेते प्रथमेश सोमण, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, रमेश मुंडे, हिंदवी सेनेचे पनवेल शाखेचे संस्थापक निलेश पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, बजरंग दलाचे गुरुनाथ मुंबईकर, विश्व हिंदू परिषदेचे अमोल साखरे, माजी नगरसेवक विकास घरत, संजय भगत, के.सी. पाटील, पनवेल शहर सरचिटणीस अमित ओझे, उपाध्यक्ष केदार भगत, विनायक मुंबईकर, रुपेश नागवेकर, चिन्मय समेळ, देवांशु प्रभाळे, आकाश भाटी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
वाशी येथे २२ ऑगस्टला झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, उर्मिलामाता तसेच श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी अवमानकारक आक्षेपार्ह वक्तव्य केले व हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या होत्या. विशेषतः या कार्यक्रमाला खासदार शरद पवार आणि कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज उपस्थित होते. या मंडळींच्या समोरच महाराव यांनी हि टीका केली आणि हि टीका या उपस्थित मंडळींनी सहनही केली, त्यामुळे सर्व स्तरातून याचाही निषेध करण्यात आला. गुरुवारी पनवेल मधील हिंदू संघटनेच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्यासमोर हिंदू संघटनेंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. राजकारण करत असताना धर्माच्या विषयात हस्तक्षेप करू नये नाही तर परिणाम उग्र होतील अशा शब्दात संतप्त कार्यकर्त्यांनी इशारा दिला.