दस्तुरी नाका ते वॉटर पाईपपर्यंत गाड्यांच्या रांगा, सततची कोंडी पर्यटकांच्या आनंदावर विरजण
माथेरान :
स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीचा लाभ घेण्यासाठी हजारो पर्यटक माथेरान घाटात दाखल झाले. सकाळपासूनच घाटाकडे जाणाऱ्या वाहनांची गर्दी वाढत गेली आणि दुपारपर्यंत दस्तुरी नाका येथील वाहनतळ पूर्ण क्षमतेने भरून गेला. वाहनतळात जागा मिळेनाशी झाल्यावर पर्यटकांना रस्त्याच्या कडेला वाहनं उभी करावी लागली. परिणामी दस्तुरी प्रवेशद्वारापासून घाटातील वॉटर पाईप पुढे जुमापट्टी स्थानकापर्यंत वाहनांच्या अखंड रांगा लागल्या यामुळे पर्यटकांना खूपच मनस्ताप सहन करावा लागला.
आज १५ ऑगस्ट स्वतंत्रदिनाची सुट्टी असल्याने माथेरान या पर्यटनस्थळी पर्यटकांचा लोंढा वाढला होता. घाटात वाहनांची कासवगती, हॉर्नांचा कर्कश आवाज आणि रस्त्याच्या कडेला पसरलेली गर्दी यामुळे घाटातील शांत वातावरण गोंगाटमय झाले. पर्यटकांना निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्याऐवजी गाडीतच तासन् तास बसून रहावे लागले. लहान मुलांसह आलेल्या कुटुंबांना विशेष त्रास सहन करावा लागला, तर अनेकांनी उशिरा पोहोचल्याने नियोजित फिरस्तीचे कार्यक्रम रद्द केले. मुंबई ठाणे परिसरातील शाळेच्या ट्रिप देखील झाल्याने अधिकच गर्दी पाहायला मिळाली. ही परिस्थिती फक्त सध्याचीच नाही. मागील काही आठवड्यांपासून दर शनिवारी-रविवारी अशीच कोंडी होत आहे. स्थानिक व्यापाऱ्यांच्या मते, गर्दी वाढल्याने व्यवसायात वाढ होते खरी, पण वाहतूक कोंडीमुळे अनेक पर्यटक नाराज होऊन लवकर परत जातात. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलीस सतत गस्त घालत आहेत. तरीही वाढत्या वाहन संख्येमुळे त्यांच्या प्रयत्नांना मर्यादा येत आहेत. काही ठिकाणी वाहने एकेरी रांगेत पुढे सरकत असल्याचे, तर काही ठिकाणी पूर्णपणे ठप्प झाल्याचे चित्र दिसून आले. याशिवाय, कर्जत तालुक्यातील नेरळ, कर्जत शहर आणि चारफाटा परिसरातही वाहनांची मोठी गर्दी झाली. सुट्टीच्या दिवशी सर्वत्र वाढलेल्या वाहन संख्येमुळे तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर प्रवास वेळेपेक्षा दुप्पट अधिक वेळ घेऊ लागला. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली असून, विशेषतः सुट्ट्यांच्या दिवशी पर्यायी वाहतूक व्यवस्थेची गरज असल्याचे सांगितले आहे.तर हे नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याने माथेरानला येण्यासाठी आतातरी शासनाने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी अशी मागणी स्थानिकांमधुन सुद्धा जोर धरू लागली आहे.