कर्जतच्या भात संशोधनाने देशाच्या अन्नसुरक्षेला बळकटी मिळेल – कुलगुरू डॉ. संजय भावे

0
14

कर्जत : ” प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात जागतिक दर्जाच्या संशोधन सुविधा निर्माण होत असल्याने देशाच्या अन्नसुरक्षेला बळकटी मिळेल “, असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी केले.रविवारी येथील संशोधन केंद्राच्या विविध प्रक्षेत्रावर भेट देऊन प्रयोगांची पाहणी केल्यावर शास्त्रज्ञांशी संवाद साधताना ते बोलत होते.
संशोधन केंद्राच्या भात पैदास विभाग, कृषीविद्या विभाग व एम.ए.ई.प्रक्षेत्रावरील सर्व प्रयोगांना भेट देत पीक परिस्थिती, संशोधनाचा दर्जा व उपयुक्तता याबाबत त्यांनी समाधान व्यक्त करीत सर्वच शास्त्रज्ञ उत्तमरीत्या काम करीत असल्याचा निर्वाळा देत त्यांचे अभिनंदन केले.
गतिमान पैदास तंत्रज्ञानामुळे नवीन भात वाण संशोधनाचा कालावधी १३-१४ वर्षांवरून ६-७ वर्षापर्यंत कमी होईल.शेतकऱ्यांच्या गरजेनुरूप बारीक , जाड, विविध गुणवैशिष्ट्ये असलेल्या हळव्या, निमगरव्या,गरव्या, अधिकाधिक उत्पादन देणाऱ्या,रोग व किडींना प्रतिकारक, बदलत्या वातावरणातही तग धरणाऱ्या, सुधारित व संकरित भात जाती संशोधित करणे सोपे जाईल.कमी खर्चिक लागवड पद्धतींची शिफारसही केली जाईल.त्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास दुनावेल आणि त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकेल,असे ते म्हणाले.पुढील महिन्यात येथील भाताशी निगडित अद्ययावत प्रकल्प सुरू करण्याचे सूतोवाच त्यांनी केले आणि त्याचवेळी शेतकरी मेळाव्याचे आयोजनही करण्यात येईल, असे सांगितले.मुख्य इमारतीच्या प्रांगणात झालेले सुशोभीकरण व अन्य बदलांबाबत समाधान व्यक्त करीत आवश्यक दुरुस्त्या सुचवत त्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.
सुरुवातीला सहयोगी संशोधन संचालक डॉ. भरत वाघमोडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत केले.यावेळी प्रमुख कृषिविद्यावेत्ता डॉ. विजय सागवेकर,कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने,कनिष्ठ भात पैदासकार डॉ .महेंद्र गवई,कनिष्ठ संशोधन सहायक डॉ. राजेंद्र सावळे व डॉ. हेमंत पवार, विद्यापीठाचे उप अभियंता गौरव मोहिते, शाखा अभियंता अतुल पाटील, कनिष्ठ अभियंता सूरज भुवड,वरिष्ठ संशोधन छात्र अनिरुद्ध मदने, कृषी सहायक किशोर सातकर, कार्यालय अधीक्षक नरसिंग निरडे प्रामुख्याने उपस्थित होते.