‘उत्सव गणरायाचा जागर पर्यावरणाचा’ मोहिमेंतर्गत,पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा ’: एक लाख रुपयांची बक्षिसे
पनवेल : येत्या बुधवार पासून गणेशोत्सवास सुरूवात होत आहे. महापालिकेच्यावतीने गणेशोत्सवाची तयारी पुर्ण होत आली असून आयुक्त श्री.मंगेश चितळे यांच्या निर्देशानूसार बांधकाम विभागाच्यावतीने कृत्रिम तलाव, घनकचरा व आरोग्य विभागाच्यावतीने विसर्जन घाटाची साफसफाईचे काम अंतिम टप्प्यात आले आहेत .याबरोबरच पर्यावरण उत्सव गणरायाचा जागर पर्यावरणाचा’ मोहिमेंतर्गत “पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा”आयोजित करण्यात आली आहे.
यावर्षी महापालिकेच्या बांधकाम विभाग व भांडार विभागाच्या 134 ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. यामध्ये 58 ठिकाणी नैसर्गिक विर्सजन ठिकाणे असून 76 ठिकाणी कृत्रिम तलावांची विसर्जनासाठी सोय करण्यात आली आहे. या सर्व विसर्जनाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक, विद्युत व्यवस्था, सीसीटिव्ही स्टेज, टॉवरची सोय, टेबल खुर्च्या, लाऊड स्पीकर,निर्माल्य कलश, लाईव्ह जॅकेटची सोय करण्यात आली आहे.
घनकचरा व आरोग्य विभागाच्यावतीने विसर्जन घाटांच्या स्वच्छतेची कामे जवळपास पुर्ण झाली आहे. पालिका क्षेत्रातील गणेश मंडळाच्या दारात जाऊन दररोज निर्माल्य गोळा करण्यासाठी महापालिकेने विशेष ‘निर्माल्य संकलन रथ’ तयार केले आहेत. हा उपक्रम मागील वर्षापासून पालिकेने सुरू केला असून यासाठी विशेष वाहनांची सोय करण्यात आली आहे. या निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यात येणार आहे. विसर्जन दिवशी विसर्जन घाटावरील स्वच्छतेसाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
गणपती विसर्जन घाटावर कोणतीही दुर्घटना होणार नाही यासाठी विद्युत विभागाच्यावतीने संपुर्ण काळजी घेण्यात आली असून, महापालिका कार्यक्षेत्रात सर्व स्ट्रीट लाईट सुरू राहतील याची खबरदारी घेण्यात आली आहे. सर्व विसर्जन घाटावर विद्युत सुरक्षितेदृष्टीने विद्युत उपकरणे, वायरिंग,जनरेटर संच इत्यादी सुस्थितीत ठेवण्यासाठीचे आदेश संबधित अधिकारी, ठेकेदार, व कर्मचारी यांची बैठक घेऊन अतिरीक्त आयुक्तांनी दिले आहेत.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम
माझी वसुंधरा 6.0 अंतर्गत पर्यावरणाच्या रक्षणासाठी पनवेल महानगरपालिकेच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी विविध उपक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये पनवेल महानगरपालिकेतर्फे “पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या विजेत्यांसाठी एकूण एक लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनी उत्साहाने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. याच बरोबर महापालिकेच्यावतीने पर्यावरण पूरक गणेशोत्सवाची सप्तसूत्री जाहीर करण्यात आली आहे.या सप्तसूत्रीचा नागरिकांनी अवलंब करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने केले आहे.