श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात संथ कारभार, अत्यावश्यक सेवेचे तीन तेरा, डॉक्टरांसह कर्मचारी देखील अपुरे.

0
29

श्रीवर्धन – संतोष चौकर
श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये अतिशय संथ गतीने कारभार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. एखादा रुग्ण अत्यवस्थ असल्यास त्याला तातडीने दाखल करून घेताना, रुग्णालयातील वेगवेगळी प्रोसिजर पूर्ण होईपर्यंत अर्धा ते पाऊण तासाचा वेळ वाया जात आहे. सध्या श्रीवर्धन तालुक्या मध्ये वायरल तापाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.गौरी गणपतीच्या सणासाठी आलेले कोकण वासीय देखील आजारी पडले आहेत. सर्वच रुग्ण शासकीय इस्पितळामध्ये उपचार घेण्यासाठी येत नसल्याने त्याचा निश्चित आकडा समजू शकत नाही.
परंतु खाजगी दवाखान्यांमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या पाहायला मिळते. ताप, सर्दी, खोकला, अंग दुखणे इत्यादी आजार मोठ्या प्रमाणावरती उद्भवत आहेत. श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात गेल्यानंतर केस पेपर काढण्यासाठीच अनेक वेळा ऑनलाइन सिस्टीम बंद असल्याचे दिसून येते. तसेच या ठिकाणी विविध आजारांसाठी डॉक्टर असून सुद्धा अनेक वेळा डॉक्टर त्यांच्या ड्युटीच्या वेळी कर्तव्यावर हजर नसल्याचे दिसून येते. रविवारी दुपारी याबद्दल एका रुग्णाला ताप आल्या कारणाने रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु सदर ठिकाणी असलेल्या आधी परिचारिकेने सदर ताप येणाऱ्या रुग्णाला गोळ्या देऊन उद्या सकाळी येण्यास सांगितले.
यावेळी देखील त्या ठिकाणी कोणीही डॉक्टर उपस्थित नसल्याचे दिसून आले. अनेक वेळा एखादा रुग्ण अत्यवस्थ असेल तर त्याला तातडीने उपचाराची गरज असते. परंतु त्या ठिकाणच्या कागदी घोडे नाचवण्यामध्येच नागरिकांचा वेळ जास्त वाया जातो. सध्या तापाचे रुग्ण जास्त असल्यामुळे बहुतांश रुग्णांना रक्त तपासण्याचा सल्ला देण्यात येतो. परंतु या ठिकाणी रक्ताचे सॅम्पल घेण्यासाठी सुद्धा कर्मचाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. तसेच सकाळी दहा ते दुपारी बारा एवढ्याच वेळात रक्त तपासणीसाठी घेतले जाते. त्यानंतर येणाऱ्या रुग्णांना खाजगी रक्त तपासणी करावी लागते. किंवा दुसऱ्या दिवसापर्यंत वाट पाहावी लागते.
तसेच रुग्णालयात व रुग्णालयातील स्वच्छतागृहांमध्ये स्वच्छतेची देखील ऐसी तैसी झालेली पाहायला मिळते. रुग्णांना बेडवरती अंथरण्यासाठी देणाऱ्या देणाऱ्या बेडशीट ह्या देखील अनेक वेळा अस्वच्छ असतात. सदर बेडवरती बेडशीट घालण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांच्या हातात दिली जाते. रुग्णालयाचा कोणताही कर्मचारी बेडशीट घालण्यासाठी उपस्थित नसतो. काही अत्यावश्यक रुग्णांना वरच्या मजल्यावर घेऊन जाण्याचे असल्यास त्या ठिकाणी बॉयची संख्या देखील कमी आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनाच सदर रुग्णाला घेऊन वरती जावे लागते.
तसेच उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांसोबत एक नातेवाईक उपस्थित असतो परंतु सदर माणसाला बसण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था रुग्णालयात नाही. श्रीवर्धनचे उपजिल्हा रुग्णालय अतिशय सुसज्य करण्यात आलेले आहे. परंतु या ठिकाणी असलेल्या प्रशासनाचा ढिसाळ कारभार व कर्मचाऱ्यांची कमी संख्या यामुळे रुग्णालयाचा कारभार संथ गतीने चालला आहे की काय? असेच दिसून येते. याबाबत श्रीवर्धनच्या आमदार व राज्याच्या बाल विकास व महिला मंत्री अदिती तटकरे यांनी तातडीने लक्ष द्यावे व या ठिकाणच्या रुग्णांना योग्य प्रकारे सुविधा उपलब्ध होईल. याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.