उलव्यात पहिल्यांदाच अभिनयाचे बादशहा अशोक सराफ यांची एंट्री होणार !

0
14

उरण  : मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज, ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता जोशी-सराफ यांची रविवारी (ता.७) आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी भेट घेतली. सोबत रंगभूमी व चित्रपटसृष्टीशी निगडित अनेक वर्षे लीलया वावरणारे नरेंद्र बेडेकर होते.
यावेळी महेंद्रशेठ घरत यांनी अशोक सराफ-निवेदिता जोशी-सराफ यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांच्यातील साधेपणा पाहून महेंद्रशेठ यांना मनस्वी आनंद झाला. यावेळी त्यांनी ‘कैलास मानसरोवर’ यात्रेवरून आणलेले जल अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांना दिले. त्यांनीही ते आनंदाने प्राशन केले. यावेळी महेंद्रशेठ घरत यांनी शाल, पुष्पगुच्छ आणि ‘सुखकर्ता’, ‘परदेश प्रवासाची पंचविशी’ आणि ‘जय शिवराय’ ही पुस्तके त्यांना भेट देऊन आनंद व्यक्त केला; तर अशोक सराफ यांनी त्यांच्या जीवनावरील ‘बहुरुपी’ हे पुस्तक आपल्या स्वाक्षरीने महेंद्रशेठ घरत यांना भेट म्हणून दिले.
यावेळी अशोक सराफ यांच्याशी संवाद साधताना महेंद्रशेठ घरत म्हणाले, “मी आपल्या अभिनयाचा चाहता आहे. आपल्या अनेक चित्रपटांमुळे मी मनमुराद हसलो आहे. आमच्या आख्ख्या पिढीने आपल्या चित्रपटांचा आस्वाद घेतला आहे. आपल्याला चित्रपटसृष्ट्रीतील उत्तम कारकिर्दीबद्दल आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. याचा मला अतिशय आनंद आहे. आईच्या नावाने ‘यमुनाबाई सामाजिक शैक्षणिक संस्थे’मार्फत आम्ही अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवित आहोत. अनेक दीनदुबळ्यांना आधार देऊन त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण फुलविण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे रायगड, नवी मुंबईच्या सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने आमच्या संस्थेमार्फत आपला नागरी सन्मान करण्याची इच्छा आहे.”
त्यावेळी हसतहसतच अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या अभिनयावर अधिराज्य गाजवणाऱ्या दाम्पत्याने नागरी सन्मान स्वीकारण्याची संमती दिली. त्यामुळे उलव्यात पहिल्यांदाच ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त अभिनेते अशोक सराफ यांचे आगमन होणार आहे. त्यांचा २८ सप्टेंबरला ‘यमुनाबाई सामाजिक शैक्षणिक संस्थे’मार्फत ‘भूमिपुत्र भवन’ येथे भव्यदिव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.