Home ठळक बातम्या रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

अलिबाग (रत्नाकर पाटील) :
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 2024-25 च्या आर्थिक कामगिरीनुसार बेस्ट एनपीए मॅनेजमेंट, बेस्ट सेक्युरिटी ऑपरेशन सेंटर आणि बेस्ट ऑडिट ट्रान्सफॉरर्मेशन हे पुरस्कार गोवा येथे होणार्या १७ आणि १८ संप्टेंबरला गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि देशाच्या सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑप बँक अँड क्रेडिट सोसायटीचे चेअरमन ज्योतिंद्र म. मेहता यांच्या हस्ते देण्यात येणार आहेत.
बँकेच्या कर्ज वसुलीतील काटेकोर धोरण, थकबाकी नियंत्रणातील शिस्तबद्धता यामुळे बेस्ट एनपीए मॅनेजमेंट हा पुरस्कार तर बँकेने माहिती-तंत्रज्ञान सुरक्षेत केलेल्या गुंतवणुकीमुळे व अत्याधुनिक सुरक्षा प्रणालींच्या अंमलबजावणीमुळे बेस्ट सेक्युरिटी ऑपरेशन सेंटर हा पुरस्कार आणि बँकेने लेखापरीक्षण प्रक्रियेत आधुनिक साधनांचा वापर करून पारदर्शकता, कार्यक्षमता आणि जोखीम नियंत्रण मजबूत केले आहे. या पद्धतींमुळे बँकेच्या कामकाजात विश्वासार्हता आणि नियामक अनुपालन वाढले आहे यामुळे बेस्ट ऑडिट ट्रान्सफॉरर्मेशन हा पुरस्कार बँकेला जाहीर झाला आहे. देशातील नामवंत संस्था एफसीबीए यांच्या वतीने हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.
नुकतेच झालेल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत महत्त्वाचे आर्थिक निर्णय जाहीर करण्यात आले. बँकेचा ढोबळ नफा ₹८५.८० कोटी तर निव्वळ नफा ₹३५.५९ कोटी इतका झाल्याची माहिती सभेत देण्यात आली. तसेच सभासदांना १२.५% लाभांश जाहीर करण्यात आला. बँकेच्या स्वनिधीने ₹७०० कोटींचा टप्पा गाठल्याचेही यावेळी सांगण्यात आले. हा निधी मार्च २०३० पर्यंत ₹१००० कोटींपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पुढील दोन वर्षांत बँकेचा व्यवसाय ₹१०,००० कोटींवर नेण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला होता. याबद्दल देखील बँकेचे कौतुक संपूर्ण महाराष्ट्रातून होत असताना जाहीर झालेले हे तीनही पुरस्कार सुद्धा बँकेचे राज्यातील सहकाराचे महत्व अधिक अधोरेकीत करणारे ठरले आहे.
बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की पुरस्कारामुळे कामाचे समाधान मिळत असते परंतु हे सर्व पुरस्कार ग्राहकांनी दाखविलेल्या विश्वासामुळे मिळत असतात. बँकेने ६० वर्षात ग्राहकांच्या हिताप्रमाणे आपले काम केलेले असून या पुरस्काराचे श्रेय हे बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील आणि संचालक मंडळ यांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन तसेच बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी आणि बँकेला सहकार्य करणारे ग्राहक यांचे आहे असे प्रतिपादन मंदार वर्तक यांनी केले. शिवाय बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील आणि संचालक मंडळ यांनी देखील बँकेच्या या पुरस्काराबाबत वाढलेली ग्राहक संख्या आणि व्यवसाय हाच आपला पुरस्कार आहे याबाबत आनंद व्यक्त केला आहे.