डॉ.चिंतामणराव देशमुख नाट्यगृह तरुण पिढीला प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
6

रायगड : ऐतिहासिक रोहा शहरात नव्याने उभारण्यात आलेले डॉ.चिंतामणराव देशमुख नाट्यगृह तरुण पिढीला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले. रोहा येथील डॉ.चिंतामणराव देशमुख नाट्यगृहाचे उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी खासदार सुनील तटकरे, महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल, उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड, मुख्याधिकारी अजयकुमार येडके, सिने अभिनेता सयाजी शिंदे, भरत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, करोना काळात या नाट्यगृहाचे भूमिपूजन माझ्या हस्ते संपन्न झाले होते. त्याच नाट्यगृहाचे उद्घाटनही माझ्या हस्ते होत आहे याचा मला आनंद आहे. आपल्या वाडवडिलांनी जपलेल्या वास्तूंचे जतन झाले पाहिजे. डॉ.चिंतामणराव देशमुख यांची प्रशासकीय कारकीर्द खूप महत्वाची होती. त्यांनी देशात चांगले काम केले आहे. ते परदेशात असताना त्यांनी आपल्या बंगल्याला रोहा हे नाव दिले होते.
डॉ.चिंतामणराव देशमुख यांनी देशाच्याच नाही तर जगाच्या पटलावरही आपले नाव कोरले आहे. कला, संस्कृती, साहित्य, क्रीडा क्षेत्रात कलेला खूप महत्व आहे. अष्टविनायक मंदिरापैकी रायगड जिल्ह्यात असलेल्या मंदिराचा विकास करावयाचा असून याकरिता आवश्यक असलेले प्रस्ताव सादर करावेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कामामध्ये पारदर्शकता ठेवली पाहिजे, काम दर्जेदार झाले पाहिजे आणि झालेल्या कामांचे लोकांना समाधान वाटले पाहिजे. या भव्यदिव्य वास्तूमध्ये लोकोपयोगी कार्यक्रम साजरे झाले पाहिजेत.
अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असलेले हे नाट्यगृह आरामदायी आसन व्यवस्था, उत्कृष्ट ध्वनी व प्रकाशयोजना, प्रशस्त आणि वातानुकूलित सभागृह, पार्किंग, कँटीन, प्रतिक्षालय यांसह सर्व आवश्यक सुविधा संपन्न आहे. रोहासह परिसरातील कलारसिक व कलाकारांसाठी हे एक हक्काचं व्यासपीठ ठरणार असून, राज्यभरातील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी हे नाट्यगृह महत्त्वाची भूमिका पार पाडेल, याबाबत शंका नाही.
लोकार्पण विशेष प्रयोगाच्या निमित्तानं ‘मोरूची मावशी’ या नाटकाच्या कलावंतांचे स्वागत करून त्यांना प्रयोगासाठी शुभेच्छा दिल्या. तसंच नाटक, संगीत, नृत्य, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यशाळा आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करून या नाट्यगृहामुळं कला-संस्कृतीला नवा उत्साह व आयाम मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
महिला व बाल विकास मंत्री कु.आदिती तटकरे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, देशाचे पहिले अर्थमंत्री पद भूषविलेले डॉ.चिंतामणराव देशमुख यांच्या नावाने नव्याने उभारण्यात आलेल्या डॉ.चिंतामणराव देशमुख नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळा सर्वांसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. सन 2020-21 मध्ये या वास्तूचे भूमिपूजन झाले आणि आज हे नाट्यगृह पूर्णत्वास गेले आहे. साधारणपणे नाटक संस्कृतिचा आरसा आहे. या ऐतिहासिक वास्तूचे उद्घाटन होत असून आपण सर्वजण याचे साक्षीदार झालो. कला, नाट्य संस्कृती जागृत ठेवली पाहिजे. आजचा हा दिवस आपल्या सर्वांसाठी विलक्षण आनंदाचा, अभिमानाचा क्षण आहे. रोह्यातील सभागृहाचे नाट्यगृहात रुपांतर झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वांत मोठा पुतळा असल्याचा मान रोहा तालुक्याला मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या वास्तूसाठी निधीची उपलब्धतता करुन दिली असून त्यांचे मी मनापासून आभार मानते. हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचे आहे.
यावेळी खासदार सुनिल तटकरे म्हणाले की, रोह्यातील धावीर महाराजांच्या आशिर्वादाने रोहेकरांची सेवा करण्याची संधी मला लाभली. या नाट्यगृहामध्ये होणाऱ्या कार्यक्रमांचा अनुभव नवीन पिढी घेणार आहे. रोहा शहरात कला व साहित्य प्रेमी यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या नाट्यगृहामुळे कला क्षेत्राला भरारी मिळणार आहे. कला संस्कृतीला यामुळे योग्य व्यासपीठ मिळाले आहे. यापुढे हे नाट्यगृह स्वच्छ ठेवणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. या नाट्यगृहात आज पहिला प्रयोग सिनेअभिनेता भरत जाधव यांचा होत असून ही सर्वांसाठी एक मोठी पर्वणी आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमाला शासकीय विविध विभागांचे शासकीय अधिकारी, कर्मचारी तसेच रोहा शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.