
अलिबाग : लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिलांना पुन्हा एकदा कागदपत्रांच्या फेऱ्यात अडकावे लागणार आहे. मागील महिन्यात करण्यात आलेल्या केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आणि त्रुटी आढळल्याने रायगड जिल्ह्यातील तब्बल 22 हजार 375 महिलांवर पुन्हा केवायसी करण्याची वेळ आली आहे. यामुळे सेवा केंद्रांवर महिलांची पुन्हा धावपळ सुरू होणार असून, आधीच वेळ आणि खर्च सहन केलेल्या लाभार्थींना पुन्हा त्रास सहन करावा लागणार आहे. योजना ‘लाडकी’ असली तरी अंमलबजावणीतल्या त्रुटींमुळे महिलांसाठी तीच डोकेदुखी ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे, स्वावलंबन वाढविणे, कुटूंबाच्या आर्थिक स्थैर्यास हातभार लावणे हा उद्देश ठेवून महिला व बालविकास विभागाने खास महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरु केली. या योजनेची सुरुवात 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी झाली. महिलांना या योजनेअंतर्गत दर महिन्याला दीड हजार रुपये अनुदान देण्यास सुरुवात करण्यात आली. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रीया राबविण्यात आली. या योजनेला रायगड जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र या योजनेचा लाभ घेताना काहींनी अटी शर्तीचे पालन न केल्याने पुन्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत ई-केवायसी करण्याचा निर्णय मागील सहा महिन्यापुर्वी घेण्यात आला. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील 63 हजार 782 लाडक्या बहिणींच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.
या योजनेअंतर्गत हजारो महिलांनी ई-केवायसी प्रक्रीया पुर्ण केली होती. परंतु तांत्रिक कारणास्तव, ही प्रक्रीया चुकीची व अपुर्ण असल्याचे महिला व बालविकास विभागाच्या निदर्शनास आले. चुकीची व अपूर्ण असलेली केवायसी प्रक्रीया पुन्हा सुरु करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील 22 हजार 375 लाडक्या बहिणींच्या कागदपत्रांची पडताळणी पुन्हा होणार आहे. ही प्रक्रीया फक्त 31 मार्चपर्यंत असणार आहे. त्यामुळे फक्त सहा दिवसच शिल्लक राहिले आहेत. या सहा दिवसात ही प्रक्रीया पुर्ण न झाल्यास महिला या योजनेसाठी अपात्र ठरण्याची शक्यता आहे.