Home ठळक बातम्या प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता ; रिक्षा चालकांवर वाहतूक शाखेची धडक मोहीम

पनवेल : पनवेल महापालिका हद्दीमध्ये रिक्षा भाडे हे मीटरप्रमाणे व्हावे यासाठी अनेक आंदोलने झाली. त्यातच मागील महिन्यात परिवहन विभागाने देखील पनवेल महापालिका हद्दीतील रिक्षा या मिटरप्रमाणे न चालविल्यास कारवाईचे संकेत दिले होते. मात्र प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन अखेर पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी बुधवारी दि. ०१ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास कारवाईला सुरुवात केली. यामध्ये ३० रिक्षांच्या मालकांवर कारवाई करण्यात आली असून एका मद्यधुंद रिक्षाचालकाची रिक्षा जप्त करण्यात आली.
प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक शाखेमार्फत मागील महिन्यातच पनवेलसह नवीन पनवेल, कामोठे, खांदा कॉलनी, कळंबोली आणि तळोजा परिसरातील रिक्षा चालकांना प्रवाशांकडून मिटरनुसार भाडे आकारण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र रिक्षाचालकांनी आपला हट्ट न सोडल्यामुळे अनेक प्रवाशांसोबत रिक्षा चालकांची तू तू मै मै झाली. अखेर जागरूक नागरिकांनी सदर बाब ही पनवेल शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्याकडे तक्रारीच्या रूपाने समोर आणल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाच्या मदतीने अखेर जुने पनवेल आणि नवीन पनवेल या दोन्ही ठिकाणी एकाच वेळी धडक कारवाई राबविली.
वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभागाचा लवाजमा येताच दोन्ही बाजूच्या रिक्षा चालक, मालकांनी पळ ठोकला. त्यामुळे काही काळासाठी याठिकाणी प्रवाशांना रिक्षा उपलब्ध नसल्याने गैरसोय झाली. यावेळी पनवेल वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी तात्काळ एनएमएमटी बस डेपोमध्ये संपर्क साधून अतिरिक्त बसेस उपलब्ध करून प्रवाशांची गैरसोय दूर केली. यामुळे प्रवाशांमधून वाहतूक विभागाच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
सदर कारवाई ही प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे उकळणाऱ्या रिक्षा चालक आणि मालकांविरोधात करण्यात आली होती. यामध्ये एकूण १२० रिक्षांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये तब्बल ३० रिक्षांचे कागदपत्र तसेच ड्रेस आदी कारणावरून कारवाई करण्यात आली. तसेच यावेळी नवीन पनवेल येथे एक रिक्षाचालक मद्यधुंद अवस्थेत रिक्षा व्यवसाय करताना आढळल्यामुळे सदर रिक्षा जप्त करण्यात आली असून त्याच्यावरही कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या मदतीने केली. यावेळी कारवाई करणाऱ्या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने, पोलीस हवालदार येळे, मुलानी, ओंबासे, पोलीस शिपाई ठाकूर, बोरेकर, केशव निकम यांच्या पथकाने केली.