Home ठळक बातम्या कर्नाळा खिंडीत अवजड वाहनाची मंकी जाळीला धडक; वाहतूक कोंडीने प्रवाशांचा मनस्ताप

अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंडीत अवजड वाहनाने मंकी जाळीला जोरदार धडक दिल्याने दोन्ही बाजूंचे लोखंडी पोल वाकून जाळी थेट रस्त्यावर आल्याची घटना घडली. जाळी रस्त्याच्या मार्गात आल्याने दोन्ही दिशेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. त्यामुळे कर्नाळा खिंडीमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
कर्नाळा खिंड हा मुंबई-पुणे तसेच कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशातच एका अवजड वाहनाने रस्त्यालगत असलेल्या मंकी जाळीला धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की, जाळीला आधार देणारे दोन्ही बाजूंचे लोखंडी पोल वाकले आणि जाळी रस्त्यावर कोसळली.
जाळी रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाला. परिणामी दोन्ही दिशेने वाहनांची गर्दी वाढत गेली आणि काही वेळातच कर्नाळा खिंडीत वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विशेषतः अवजड वाहनांमुळे वाहतुकीचा वेग मंदावल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली होती.
घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिसांचे पथक तसेच पळस्पे वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेत तत्काळ मदतकार्य सुरू केले. रस्त्यावर आलेली मंकी जाळी बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले. यासाठी आवश्यक ती कार्यवाही करून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला.
दरम्यान, पोलिसांनी वाहनांची गर्दी नियंत्रित करत वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू केली. एका बाजूची वाहतूक मार्गस्थ केल्यानंतर दुसऱ्या बाजूची वाहने सोडण्यात आली. त्यामुळे काही वेळातच कर्नाळा खिंडीतील वाहतूक पूर्ववत करण्यात पोलिसांना यश आले.
पोलिस आणि वाहतूक शाखेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत केलेल्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली. तसेच वाहतूक कोंडी अधिक काळ राहिली नाही. या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षाव्यवस्था आणि रस्त्यालगतच्या मंकी जाळ्यांची देखभाल याकडे संबंधित यंत्रणांनी नियमितपणे लक्ष देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.