Home ताज्या बातम्या जिल्हयातील रुग्णालयांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये नोंदणी करावी तर कोविड...
अलिबाग (जिमाका):- म्युकरमायकोसीस (Mucormycosis) या आजाराने बाधीत रुग्णांना रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी आर्थिक बोजा पडू नये व सर्वच नागरिकांना आरोग्य विषयक हमी व आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंगीकृत रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येणार आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंगीकृत रुग्णालयामध्ये रायगड जिल्ह्यातील 1) एमजीएम हॉस्पिटल कामोठे, 2) लाईफ लाईन हॉस्पिटल पनवेल, 3) जिल्हा सामान्य रुग्णालय, अलिबाग या तीन रुग्णालयांची निश्चिती करण्यात आलेली आहे.
कोविड-19 च्या काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची (Mucormycosis) लक्षणे आढळून येत आहेत. हा एक बुरशीजन्य आजार आहे. या आजारावरील उपचारासाठी बहुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज भासते. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये Rhinocerebral Mucormycosis for 10 Days Stay हे पॅकेज उपलब्ध आहे. याप्रमाणेच वैद्यकीय व शस्त्रक्रिया उपचारांशी संबंधित इतर पॅकेजेस सुद्धा उपलब्ध आहेत. तथापि सध्या राज्यामध्ये लागण झालेल्या म्युकरमायकोसीस (Mucormycosis) या आजाराची तीव्रता लक्षात घेता याकरीता बहुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज असून याकरीता येणारा खर्चही जास्त आहे. यामुळे खाजगी रुग्णालयातील उपचारावरील खर्चामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भार सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर म्युकरमायकोसीस (Mucormycosis) या आजाराने बाधीत रुग्णांना रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी आर्थिक बोजा पडू नये, आरोग्य विषयक हमी व आर्थिक दिलासा यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या अंगीकृत रुग्णालयामध्ये उपचार मिळावेत यासाठी दि. 18 मे, २०२१ रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत ११ सर्जीकल पॅकेज व ८ मेडीकल पॅकेज उपलब्ध करुन दिले आहेत.
या दोन्हीही योजनांतर्गत रु.1.50 लक्ष पर्यत विमा संरक्षण आहे. त्यापुढे हमी तत्वावर रु.5.00 लक्ष पर्यंत संरक्षण आहे. तसेच म्युकरमायकोसीस या आजारापूर्वी बाधित व्यक्तीवर वा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीवर उपलब्ध विमा संरक्षणापैकी काही रक्कम खर्च झालेली असू शकते. या दोन्ही योजनांतर्गत अनुज्ञेय विमा संरक्षणापेक्षा अधिक खर्च आल्यास अधिकचा खर्च राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून हमी तत्वावर भागविण्यात येणार आहे.
तसेच रायगड जिल्हयातील इतर १९ रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनांतर्गत पात्र नागरिकांवर उपचार करण्यात येत आहेत. यामध्ये 1) एमजीएम हॉस्पिटल कळंबोली, 2) उन्नती हॉस्पिटल पनवेल, 3) आर. एस. एस. जनकल्याण पटवर्धन हॉस्पिटल पनवेल, 4) बिर्मोले हॉस्पिटल पनवेल, 5) पनवेल हॉस्पिटल, पनवेल, 6) अलिबाग डायलेसिस सेंटर अलिबाग, 7) लायन हेल्थ फाउंडेशन अलिबाग, 8) श्री साई मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल ट्रामा केअर सेंटर खारघर, पनवेल, 9) डॉ.जी.डी पोळ फाउंडेशन, वायएमटी जनरल हॉस्पिटल पनवेल, 10) संजीवनी आरोग्य संस्था मुरुड, 11) श्री सत्य साई संजीवनी हॉस्पिटल खारघर पनवेल, 12) एसीटीआरईसी हॉस्पिटल पनवेल, 13) उपजिल्हा रुग्णालय माणगाव, 14) उपजिल्हा रुग्णालय, महाड व ट्रामा केअर सेंटर महाड, 15 ) उपजिल्हा रुग्णालय पनवेल, 16) उपजिल्हा रुग्णालय कर्जत, 17 ) उपजिल्हा रुग्णालय पेण, 18) उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन, 19) उपजिल्हा रुग्णालय रोहा इ. ९९ रुग्णालयांचा समावेश आहे.
तरी रायगड जिल्हयातील जास्तीत जास्त रुग्णालयांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये नोंदणी करावी व कोविड रुग्णांनी उपचारासाठी महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी यांनी केले आहे.