पालकमंत्री आदिती तटकरेंनी दिल्या बालरूग्णालयांना भेटी

0
146

पनवेल :

            कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी पनवेल शहरातील डॉ.भांडारकर रुग्णालय, डॉ.नाडकर्णी  रुग्णालय, डॉ.बिरमुळे रुग्णालयांना भेटी देऊन तेथील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी आयुक्त सुधाकर देशमुख, उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले, उपायुक्त संजय शिंदे, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, तहसिलदार विजय तळेकर, डॉ भोईटे, डॉ.पंडित, डॉ. जाधव उपस्थित होते.

         तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना फारसा धोका उद्भवण्याची शक्यता नसली तरी देखील प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आराखडा आखणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी बालरोग तज्ञ  डॉ.भांडारकर, डॉ.नाडकर्णी , डॉ.बिरमुळे यांच्याशी आगामी नियोजनाच्या दृष्टीने चर्चा केली. लहान मुलांमध्ये आढळून येणारी लक्षाणे,  कमी-अधिक स्वरुपाच्या लक्षणानुसार लहान मुलांवर करण्यात येणाऱ्या उपचाराविषयी त्यांनी माहिती घेतली. प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना पुरेसे ऑक्सीजन बेड्स, आयसीयू बेडस्, पिडियाड्रिक व्हेंटिलेटर्स उपलब्धतेविषयी यावेळी चर्चा करण्यात आली. त्यानुसार व्यवस्था करण्याविषयीच्या सूचना पनवेल महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आल्या.

नव्याने होणाऱ्या कळंबोली येथील प्रस्तावित जंबो कोविड सेंटर येथे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसाठी 50 आयसीयूबेडस्, १०० ऑक्सीजन बेडस् , एमजीएम रुग्णालयात २० बेडस्, उपजिल्हा रुग्णालयात २० बेडस् राखीव ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी लहान मुलांसाठी गरजेनुसार वैद्यकिय सोयीसुविधा उपलब्ध करण्याविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.