भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची महत्त्वाची भूमिका
माथेरान : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधील राजकीय उलथापालथीमुळं तेथील वातावरण अचानक तापलं आहे. माथेरान नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह दहा नगरसेवकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राज्यात प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. हा प्रवेश सोहळा कोल्हापूरमध्ये पार पडला.
माथेरान नगरपालिकेत एकूण नगराध्यक्ष आणि 17 नगरसेवक आहेत. त्यापैकी 14 नगरसेवक शिवसेनेचे, दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि एक कॉंग्रेसचा असे पक्षीय बलाबल आहे. तसेच दोन स्वीकृत नगरसेवक आहेत ते शिवसेनेचेच आहेत. या मधील शिवसेनेचे 9 नगरसेवक व एक स्वीकृत नगरसेवक आशा दहा नगरसेवकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रायगडचे माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष मंगेश म्हसकर, किरण ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. या पक्षांतरामुळे माथेरान नगरपालिकेत भाजप बहुमतात आला आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये उपनगराध्यक्ष तथा आरोग्य समिती सभापती आकाश चौधरी, राकेश चौधरी, सोनम दाभेकर, प्रतिमा घावरे, रुपाली आखाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम,ज्योती सोनावळे, संदीप कदम, आणि स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत जाधव यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिवसेनेच्या दहा नगरसेवकांना भाजपमध्ये आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं बोललं जात आहे. ठाकूर यांची कार्यपद्धती व नेतृत्व भावल्यामुळं भाजपमध्ये प्रवेश केल्याचं या नगरसेवकांचं म्हणणं आहे. पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या झालेल्या पराभवानंतर राज्यातील महाविकास आघाडीला भाजपनं हा दुसरा झटका दिला आहे. चंद्रकांत पाटील यांनी या निमित्तानं महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. ‘झोपेत असतानाच एक दिवस हे सरकार पडेल. सरकारची झोपमोड कधीच झाली आहे. ‘ असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ‘भाजपमध्ये प्रत्येकाचा सन्मान केला जातो. गुणवत्तेप्रमाणे संधी दिली जाते. त्यामुळं आता भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माथेरानमधील पदाधिकाऱ्यांंनाही योग्य ती संधी दिली जाईल,’ असं आश्वासनही पाटील यांनी दिले.