रोहा कोलाड मार्गावर वाढलेल्या वृक्षांच्या फांद्यामुळे प्रवाशांचे जीव टांगणीला…

0
176

गोवे-कोलाड   :  रोहा कोलाड मार्गावरील किल्ला ते कृषी विद्यापीठ अशोकनगर दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा बाजूस भल्या मोठ्या वृक्षांच्या फांद्या अगदी रस्त्याच्या मधोमध उंचावर वाढलेल्या व आडव्या झुकलेल्या अवस्थेमध्ये येथून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला असून प्रवासादरम्यान जीव टांगणीला लागत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून या अनावश्यक धोकेदायक फांद्या तोडण्यास कोणीही पुढे येत नसल्यामुळे प्रवाशांवर टांगती तलवार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.  दरवर्षी या धोकादायक फांद्या पावसाळ्यात प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत. रोहा हे  तालुक्याचे मुख्य ठिकाण असल्यामुळे अनेक शासकीय कामांसाठी तसेच बाजारपेठेतील खरेदीसाठी दररोज अनेक नागरिक कोलाड कडून मोठ्या संख्येने या मार्गावरून ये-जा करत असतात. मुरुड सारखे पर्यटन स्थळ असल्यामुळे अनेक शहरातील पर्यटकही सातत्याने या मार्गाचा अवलंब करत असतात. चारचाकी, दुचाकी,  रिक्षा,  सायकल स्वार असे अनेक प्रवासी या मार्गावरून सातत्याने प्रवास करत असतात.  कृषी विद्यापीठ समोर रस्त्यालगत आणि रस्त्याच्या मधोमध वाढून आलेल्या अनावश्यक फांद्या तेथून हटविणे अत्यंत आवश्यक आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वादळी वारा या वाऱ्याच्या व मुसळधार पावसामुळे अचानकपणे फांद्या रस्त्याच्या मधोमध तुटण्याची दाट शक्यता आहे. या फांद्या अत्यंत मोठ्या आकाराच्या आणि अवजड  त्याचप्रमाणे लांबलचक असल्यामुळे अत्यंत गंभीर धोका उद्भवण्याची दाट शक्यता आहे. एक जरी फांदी खाली आली तर नक्कीच कोणाचे तरी जीव घेईल एवढी मोठी फांदी एका झाडाला आहे. अशी अनेक मोठमोठी झाडे रस्त्यालगत आहेत की ज्यांच्या फांद्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेल्या असुन अत्यंत प्रवाश्यांच्या जीवाला धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहेत.