करंजाडेतील आरोग्य उपकेंद्रात लसीकरणाला सुरुवात

0
155

पनवेल: करंजाडे परिसरातील नागरी आरोग्य उपकेंद्राचे उदघाटन सोमवारी (दि.२४ मे) पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले होते. लवकरच याठिकाणी कोविड लसीकरण केंद्र सुरु होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर करंजाडे येथील आरोग्य केंद्रात प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील यांच्या हस्ते फीत कापून या लसीकरण केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे, उपसरपंच योगेंद्र कैकाडी, करंजाडे ग्रामपंचायत सदस्य ध्रुव(मंगेश) बोरकर, भरत राणे, नीलम भगत, नाथा भरवाड, शिवसेना करंजाडे शहर प्रमुख गौरव गायकवाड, शिवसेना संघटक नंदकुमार मुंडकर, पत्रकार रवींद्र गायकवाड, माजी उपसभापती प्रल्हाद केणी, पनवेल अर्बन बँकेचे संचालक अनिल केणी, वडघर विभागीय अध्यक्ष समीर केणी, वडघर ग्रामपंचायत सदस्य नासिर यांच्यासह परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
करंजाडे वसाहतीचे नागरीकरण आणि विस्तार झपाट्याने होत आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. करंजाडेतील नागरिकांना खाजगी दवाखान्यात महागडे उपचार घेताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे सिडकोने सुरवातीलाच याठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची सोय करणे अपेक्षित होते. हे उपकेंद्र सुरू करण्यासाठी विविध स्तरावरून पाठपुरावा सुरूच होता. गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद आरोग्य विभाग व सिडको आरोग्य विभागाच्या समन्वयाने हे आरोग्य उपकेंद्र पनवेल पंचायत समिती आरोग्य विभागाकडे हस्तांतर करण्यात आले. त्यानुसार हे उपकेंद्र सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या. सोमवारी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते फीत कापून या आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशीनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरी आरोग्य उपकेंद्रात लसीकरणास सुरवात झाली. यावेळी सुरुवातीला ४० नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.