आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू; मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार

0
123

अलिबाग : तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसले.
मुख्यमंत्री आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास तळिये गावात पोहोचले.
यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहन मंत्री अनिल परब, खासदार सुनील तटकरे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मिलिंद नार्वेकर, आमदार भरत गोगावले, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, महाडच्या प्रांत प्रतिमा पुदलवाड, पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पनवेल प्रांताधिकारी दत्तात्रय नवले, सुधागड तहसिलदार दिलीप रायण्णावर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, पकंज गीरी, सुरज खाडे, युवराज खाडे, तळिये गावाचे सरपंच, ग्रामस्थांचे नातेवाईक आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री भर पावसात चिखलातून वाट काढत घटनास्थळी पोहोचले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी येताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना घटनेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी स्थानिकांचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यांचं सांत्वन करीत त्यांना धीर दिला.
सध्याची नैसर्गिक परिस्थिती पहाता “जलव्यवस्थापन” हा विषय समजून घेऊन त्याचे योग्य प्रकारे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी हानी कमी होईल. राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या परिस्थितीमध्ये केंद्रीय यंत्रणा राज्याला उत्तम सहकार्य करीत आहे. त्यामुळे आपत्तीग्रस्त नागरिकांच्या बचावकार्यास वेग आला आहे.