म्हसळा : गेल्या आठवडाभर कोकणाला झोडपणाऱ्या तुफानी पावसाने संपूर्ण कोकण उध्वस्त करून सोडले होते. त्यात रायगड जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टीमुळे संपूर्ण जनजीवन उध्वस्त झाले असून अतिवृष्टी आणि दरडी कोसळून महाड आणि पोलादपूर तालुक्यातील अनेक कुटुंब दरडी खाली गाडली गेली असून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. लोकांना पिण्याच्या पाण्याचा थेंबासाठीही चातकासारखी वाट पहावी लागत आहे, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हसळा शहर आणि तालुक्यातील ग्रामस्थ तसेच म्हसळा नगरपंचायत यांच्या विद्यमाने पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू गोळा करून गेल्या दोन दिवसांपासून महाड पोलादपूर येथील पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु असून जोपर्यंत जनजीवन पूर्ववत होत नाही तोपर्यंत म्हसळ्यातून महाड पोलादपूर पूरग्रस्तांसाठी मदत पुरविण्याचा निर्धार म्हसळा वासियांनी केला आहे. वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या टीमकडून पूरग्रस्त जखमींवर फार मोठ्या प्रमाणात उपचारही सुरु आहेत.