पनवेल : कळंबोली येथील मॅकडोनाल्ड हॉटेलमध्ये व्यवस्थापकाच्या मनमानीला कंटाळून शुक्रवारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. जोपर्यंत संबंधिताची बदली होत नाही तोपर्यंत काम करणार नाही अशा प्रकारची भूमिका आंदोलकांनी घेतली. पनवेल मनपाचे सभागृहनेते परेश ठाकूर आणि महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना पाठिंबा देऊन व्यवस्थापनाला जाब विचारले त्यानुसार मागण्या मान्य करण्यात आल्या.
कळंबोली येथे मॅक्डोनाल्ड हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थापकडून त्रास दिला जातो होता. त्यांच्या वेतनामध्ये कपात करणे. वेळेच्या अगोदर कामावर बोलवणे. जास्त वेळ काम करुन घेणे त्याचबरोबर इतर अनेक प्रकारे त्रास संबंधित व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना देत होता. काही दिवसांपूर्वीच त्याची या ठिकाणी बदली झाली होती. येथे काम करणारे सर्व कर्मचारी हे स्थानिक असल्याने परप्रांतीय व्यवस्थापक हेतुपुरस्सर त्यांच्यावर अन्याय करीत होता. यासंदर्भात व्यवस्थापनाला तक्रार केल्यानंतरही त्याच्यावर कोणतीच कारवाई होत नव्हती. या सर्व गोष्टींचा विचार करून या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी कामबंद आंदोलन केले. विशेष म्हणजे सभागृह नेते परेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती मोनिका प्रकाश महानवर, भाजपचे कळंबोली मंडल अध्यक्ष रवीनाथ पाटील, युवा नेते रामदास महानवर यांनी उपस्थित राहून संबंधित कामगारांना पाठिंबा दिला. यासंदर्भात त्यांनी व्यवस्थापनाशी ही चर्चा केली.
अशाप्रकारे व्यवस्थापक मग्रूर पणाचे वर्तन करत असेल, त्याचबरोबर जाणून-बुजून कर्मचाऱ्यांना त्रास देत असेल तर संबंधित व्यवस्थापकाची इतरत्र बदली करण्यात यावी अशा प्रकारची मागणी परेश ठाकूर आणि मोनिका महानवर यांनी केली. यासंदर्भात व्यवस्थापनाने नमते धोरण घेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या. परेश ठाकूर यांनी मध्यस्थी करीत सर्व कर्मचाऱ्यांना पुन्हा कामाला सुरुवात करण्याची विनंती केली. असाच प्रकार पुन्हा जर सुरु राहिला तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आला.