Home ताज्या बातम्या परंपरा संघर्षाची, वज्रमूठ निर्धाराची या सुत्राचा वापर करणार – आ. बाळाराम पाटील
उरण – पनवेलमध्ये शेकापचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आता परंपरा संघर्षाची, वज्रमूठ निर्धाराची या सुत्राचा वापर करण्याची घोषणा कोकण शिक्षक मतदार संघाचे आ. बाळाराम पाटील यांनी उरण येथे आयोजित करण्यात आलेल्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्ताने केली. शेतकरी कामगार पक्षाचा 74 वा वर्धापन दिन उरण येथील एसएसपी इंटरनॅशनल स्कूल फुंडे येथील सभागृहात काल आयोजित करण्यात आला होता.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आ. बाळाराम पाटील यांनी शेकापक्ष सोडून अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते गेले आहेत. त्यामुळे पनवेल महापालिका आणि उरण-पनवेल मधील आगामी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शेकापला अस्तित्व टिकविणे अवघड होऊन बसले आहे. मात्र त्यानंतरही उरण – पनवेलमधील प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या बळावर चांगले वातावरण निर्माण केले आहे. तरीही आगामी निवडणूकांसाठी कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद दूर सारून एकत्रितपणे शेकापची वज्रमूठ तयार करण्याचे आवाहन आ. बाळाराम पाटील यांनी केले आहे.
यासाठी येत्या वर्षभरात परंपरा संघर्षाची, वज्रमूठ निर्धाराची या सुत्राचा वापर करण्यात येईल असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. नवीमुंबई विमानतळाबाबत विचार मांडताना महाआघाडीच्या भुमिकेशी शेकाप सहमत आहे. मात्र भावनिक विचार करून दिबांच्या नावासाठी विरोध ना बाळासाहेबांच्या नावासाठी आग्रह अशी सावध भूमिका शेकापने घेतली आहे. तसेच विमानतळाच्या नामकरणाबाबत महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, शरद पवार यांनीही आपली भुमिका स्पष्ट केलेली नसल्याचा गौप्यस्फोट आ.बाळाराम पाटील यावेळी यांनी केला.
शेकाप नेते विवेक पाटील यांच्या अटकेनंतर विरोधकांनी दुषित वातावरण निर्माण केले. शेकाप समितीतुन बाहेर कसा पडेल यासाठीही विरोधकांनी राजकारण केले. विरोधकांच्या गलिच्छ राजकारणामुळे अखेर समितीमध्ये फुट पडली. यामुळे समितीतुन शेकाप बाहेर पडला असल्याचा आरोपही त्यांनी भाषणातून केला. तसेच उरण,पनवेलमध्ये 15 ऑगस्ट पर्यंत शेकापची नवीन कार्यालये उघडण्यात येतील असा संकल्पही त्यांनी जाहीर केला. याप्रसंगी शेकापचे जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील, सिमा घरत,राजिप सदस्य राजेंद्र पाटील, मेघनाथ तांडेल यांनीही मनोगत व्यक्त केले.
शिक्षक आ. बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी,उद्योजक तथा पनवेल माजी नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे,राजिप सदस्य राजेंद्र पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राजेंद्र पाटील, राजेश केणी, पनवेल महापालिका विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी नगराध्यक्षा अनुराधा ठोकळ,शेकाप पनवेल तालुका चिटणीस नारायण घरत, उरण तालूका चिटणीस मेघनाथ तांडेल, पंचायत समिती उपसभापती शुभांगी पाटील सदस्य, नरेश घरत, वैशाली पाटील, समिधा म्हात्रे न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच जितेंद्र म्हात्रे, रमाकांत म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.