उरण : सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नवी मुंबई पोलिस आयुक्तांनी दिलेल्या सुचनेनंतर उरणच्या राखीव द्रोणागिरी डोंगर व परिसरात वन विभागाच्या परवानगी शिवाय जाण्यास हौशी पर्यटकांना मनाई आदेशही जारी करण्यात आले आहेत.
द्रोणागिरी डोंगर व परिसर राखीव आहे.या डोंगरावर ऐतिहासिक द्रोणागिरी किल्लाही आहे.तसेच या डोंगराच्या पायथ्याशी अत्यत संवेदनशील म्हणून ओळखला जाणारा राष्ट्रीय ओएनजीसी प्रकल्प आहे. केंद्रीय सुरक्षा रक्षक या ओएनजीसी प्रकल्पाची डोळ्यात तेल घालून संरक्षण करीत आहेत.
निसर्गाच्या सान्निध्यात वसलेल्या या द्रोणागिरी डोंगर आणि ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या मागील काही वर्षांपासून वाढली आहे.तसेच काही सामाजिक संस्थाकडूनही ट्रेकिंगसाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. यामुळे या राखीव वन डोंगर परिसरात पर्यटकांची गर्दी वाढते आहे.तसेच हौशी पर्यटकांकडून मद्यपान करून धिंगाणा घालण्याच्या प्रकारातही वाढ झाली आहे. या राखीव परिसरात वाढत्या पर्यटकांमुळे अत्यंत संवेदनशील असलेल्या ओएनजीसी प्रकल्पाची सुरक्षा धोक्यात आली आहे.
संवेदनशील परिसराचा दुरुपयोग करून काही अज्ञात देशद्रोही,समाजकंटक राष्ट्रहिताच्या विरोधात घातपाती कारवाया करण्याचा शक्यता आहे.याची खातरजमा करण्यासाठी सुरक्षा शाखा, संयुक्त राज्य गुप्तवार्ता, इंटलिजन्स ब्युरो, स्थानिक पोलीस आदि विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी केली होती.या पाहणीनंतर ओएनजीसी प्रकल्पाची सुरक्षा धोक्यात आल्याच्या निष्कर्षावर सुरक्षा यंत्रणा पोहचली आहे. राखीव वन, ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला आणि संवेदनशील ओएनजीसीच्या सुरक्षेसाठी या परिसरात हौशी पर्यटक, सामाजिक संस्था, ट्रेकर्स यांना वन विभागाने मनाई करण्याचे आदेश नवीमुंबई पोलिस आयुक्तालयाकडून देण्यात आले आहेत. नवीमुंबई पोलिस आयुक्तालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर पर्यटकांसाठी द्रोणागिरी, डोंगर, किल्ला परिसरात परवानगीशिवाय जाण्यासाठी मनाई आदेश वनविभागाने जारी केले आहेत.तशाप्रकारचा मनाईचा फलकही लावण्यात आला असल्याची माहिती उरण वनक्षेत्रपाल शशांक कदम यांनी दिली आहे.