दिबांच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी असलेल्या राघूबाईंचे निधन

0
525

वयाच्या १०३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पनवेल:

          प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र किती कडवा असतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे राघूबाई म्हात्रे. देशभर गाजलेल्या जासई येथील आंदोलनात १६ जानेवारी १९८४ रोजी दोन हुतात्मे झाले होते त्यादिवशी राघूबाई म्हात्रे यासुद्धा गोळीबारात जखमी झाल्या होत्या. तरीही त्या हिंमत हरल्या नाहीत.! त्यानंतर झालेल्या शेतकऱ्यांच्या प्रत्येक आंदोलनात त्यांचा सहभाग असायचा. वयाची शंभरी उलटली होती. यावर्षी विमानतळाला दिबांचे नाव देण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. १० जुनला झालेले साखळी आंदोलन, २४ जुलै चे सिडको घेराव आंदोलन त्या आंदोलनातही राघूबाई सहभागी झाल्या होत्या. १० दिवसांपूर्वी झालेल्या मशाल मोर्चात त्यांनी खणखणीत आवाजात नवी मुंबई विमानतळासाठी दिबांच्या नावाची आग्रही मागणी केली. दुर्दैवाने काल (बुधवार दि.१९ ऑगस्ट) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राघूबाईंच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

             मशाल मोर्चाच्या दिवशी एका मुलाखतीत त्यांनी १९८४ पासून झालेल्या आंदोलनाच्या स्मृती जाग्या केल्या होत्या. नामांतर आंदोलनात प्रमुख भूमिका निभावणारे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनाही राघूबाई आवर्जून भेटल्या. त्यावेळी रामशेठ ठाकूर यांनी राघूबाईंना आग्रहाने आपल्या बरोबर जेवायला बसवले. भावुक झालेल्या राघूबाई त्यावेळी म्हणाल्या की, रामशेठ जोपर्यंत विमानतळाला दि. बा. पाटीलांचे नाव मिळत नाही तोवर अखेरच्या श्वासापर्यंत मी लढत राहणार.

येथील भूमीपुत्र पेटून उठल्यावर किती संघर्षमय होतो याचेच हे ज्वलंत उदाहरण आहे. राघूबाईचा लढता लढता प्राण गेला आहे. विमानतळाला दिबांचे नाव देण्यासाठी गेलेला या आंदोलनातील हा पहिला बळी असल्याचे मत प्रकल्पग्रस्तांकडून व्यक्त होत असून सरकारला आता तरी जाग येईल का.? असा सवाल प्रकल्पग्रस्त करीत आहेत.