परेश ठाकूर यांच्या हस्ते शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्राचे उदघाटन!

0
160

पनवेल :  राज्यातील कोरोना संसर्ग आता आटोक्यात येत असून लसीकरण जेवढे जास्त होईल तेवढे कोरोना प्रतिबंध उपायांना बळ मिळेल या भावनेतून पनवेल येथील शुश्रूषा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या लसीकरण केंद्राचे उदघाटन पनवेल महानगर पालिकेचे सभागृह नेते मा. परेश ठाकूर यांनी केले,यावेळी शुश्रूषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व प्रख्यात हृदय शल्यविशारद डॉ. संजय तारळेकर, पनवेल मॅटर्निटी व इन्फन्ट वेलफेयर लीगचे संचालक विजय लोखंडे, स्थानिक नगरसेविका रुचिता लोंढे, नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक नितीन पाटील, माजी नगरसेवक संदीप पाटील, शुश्रूषा हॉस्पिटलचे बिजनेस हेड डॉ. मधुकर राठोड तसेच शेखर राव व पनवेलचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पनवेल येथिल जुन्या पोस्ट ऑफिस जवळ पटवर्धन रोडवर शुश्रूषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोव्हीशिल्ड लस १८ वर्षावरील नागरिकांसाठी उपलब्ध असणार आहे, यामध्ये पहिल्या तसेच दुसऱ्या डोसचा समावेश आहे. यावेळी बोलताना सभागृह नेते परेश ठाकूर म्हणाले , ” पनवेल शहरात उपल्बधतेनुसार लसींचा पुरवठा व लसीकरण केंद्रात वाढ करीत आहोत. लसीकरणामुळे मृत्युदर कमी होत असून कोरोना पॉझिटिव्ह रेट कमी होत आहे. लसीकरणानंतर पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णांना जास्त त्रास होत नाही त्यासाठी नागरिकांनी लसीकरण करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.”
लसीकरण व कोरोना विषयी बोलताना शुश्रूषा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक व हृदय शल्यविशारद डॉ. संजय तारळेकर म्हणाले, “कोरोनाची दाहकता आपण सर्वांनी अनुभवली आहे. कोरोनाचा नायनाट करणे याक्षणी तरी शक्य नाही परंतु कोरोनाला आपण लसीच्या माध्यमातून आपण प्रतिबंध करू शकतो. कोरोनाची लस शरीरातील प्रतिकार शक्ती वाढविण्यास नक्कीच मदत करते. लसीकरणाचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरण हाच एक रामबाण उपाय सध्या उपलब्ध आहे.शुश्रूषा हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्राचे सिक्युरिटी चेक आणि वेटिंग एरिया, ओळख पटवण्यासाठी डेस्क, लसीकरण करण्यात येणारी रूम व ऑब्झर्वनशन रूम (निरीक्षण केंद्र) अशा चार भागात विभाजन करण्यात आले आहे.”