पनवेल : राजकारणाचा आधार घेऊन गांधी परिवाराचे नाव प्रकल्पांना देतात. मात्र ज्यांनी गरिबांसाठी संघर्ष केला, भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिला अशा थोर संघर्षमूर्ती दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यास महाराष्ट्र सरकार का विरोध करत आहे हे ठाकरे सरकारने जाहीर करावे, असे आव्हान राज्याचे माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला आज(दि. २५) येथे दिले.
ओवळे विभागातील शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते तसेच २७ गाव समिती कार्याध्यक्ष सुनिलशेठ म्हात्रे तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन म्हात्रे, तुकाराम म्हात्रे, संतोष म्हात्रे यांच्यासह महिला मंडळ, ज्येष्ठ, महिला, युवक शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. मार्केट यार्ड मधील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात हा पक्षप्रवेश सोहळा राज्याचे माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
आमदार आशिष शेलार यांनी पुढे बोलताना, भूमिपुत्रांच्या हक्कासाठी दि. बा. पाटील यांनी आपले आयुष्य वेचले, अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष केला त्यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला लागलेच पाहिजे असे सांगतानाच यासाठी उभारण्यात आलेल्या लढ्याचे त्यांनी कौतुक करत हा मतांचा संघर्ष नाही तर भूमिपुत्रांच्या अस्मितेसाठी संघर्ष असून दिबांचे नाव विमानतळाला लागलेच पाहिजे आणि त्यासाठी तसूभर मागे हटणार नाही, असा स्पष्ट ईशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. सिडकोचे अध्यक्ष असताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी येथील समस्या, नागरिकांचे प्रश्न, भूमिपुत्रांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हंटले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करीत असून या पक्षात सर्व कार्यकर्त्यांना मान सन्मान आणि काम करण्याची संधी मिळते. आज आम्ही ७० व्या वर्षीही राजकारण समाजसेवा करीत आहे त्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद मिळत आहे आणि त्यातून आम्हाला कार्य करण्याची ऊर्जा मिळते. दिबासाहेबांच्या नावासाठी सर्वपक्षीय लढा उभारला. लढ्याला मोठे यश आले मात्र समिती रामशेठ ठाकूर यांनी हायजॅक केली असा आरोप शेकाप करतो समितीत बाळाराम पाटील यांना कार्याध्यक्ष पद होते मग त्यांनी का काम केले नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शेकापला पनवेल उरण मधून हद्दपार केले.