कोरोना विषाणूचा पार्श्वभूमीवर क्रांतिकारी सेवा संघाची दहीहंडी रद्द

0
256

अध्यक्ष नामदेवशेठ फडके यांचा निर्णय

पनवेल  : सध्या कोरोना विषाणूने भारतात धुमाकूळ घातलेला आहे. या पार्श्वभूमीवर 31 ऑगस्ट रोजी होणारा दहीहंडी उत्सव क्रांतिकारी सेवा संघाने रद्द केला असल्याची माहिती अध्यक्ष नामदेव शेठ फडके आणि नरेन्द्र भोपी- रायगड जिल्हा प्रवक्ता यांनी दिली आहे.

                क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दरवर्षी नवीन पनवेलमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा केला जातो. या दहीहंडी उत्सवात अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करून त्यांचा गुणगौरव केला जातो. तसेच त्यांना रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव केला जातो. क्रांतिकारी सेवा संघातर्फे माळीन येथे आलेल्या पूरग्रस्तांसाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती. तर महाराष्ट्रात आलेल्या पुरात झालेल्या नुकसानातील पूरग्रस्तांना 50 हजार रुपयांची रोख मदत क्रांतिकारी सेवा संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नामदेवशेठ फडके यांच्यातर्फे करण्यात आली होती.

           कोणत्याही राजकीय पक्षाचे वलय नसताना केवळ निस्वार्थपणे नामदेव शेठ फडके अनेकांना मदत करत असतात. त्यामुळे त्यांना जवळपास 100 हून अधिक सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. क्रांतिकारी सेवा संघातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या दहीहंडी उत्सवात जवळपास सात ते आठ लाखांची बक्षिसे ठेवण्यात येतात व गोविंदा पथकांना देखील यावेळी रोख रक्कम व सन्मानचिन्ह येते. या दहीहंडी ला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभते. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय क्रांतिकारी सेवा संघाने घेतलेला आहे. शासनाला मदत आणि सहकार्य करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला असल्याचे नामदेव शेठ फडके यांनी सांगितले आहे.