पनवेल : खारघर, कामोठे, कळंबोली व नवीन पनवेल येथील पाणी पुरवठा समस्यांबाबत तसेच भविष्यकालीन पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सूचित केल्याप्रमाणे सिडकोने दखल घेतली. त्या अनुषंगाने आज(बुधवार, दि. ०१) सीबीडी बेलापूर येथे सिडको भवनात महत्वपूर्ण बैठक झाली.
आमदार प्रशांत ठाकूर, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस पनवेल महानगरपालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, माजी उपमहापौर विक्रांत पाटील, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती सुशिला घरत, हेमलता म्हात्रे, अनिता पाटील, समीर ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, हरेश केणी, डॉ. अरुणकुमार भगत, बबन मुकादम, अभिमन्यू पाटील, एकनाथ गायकवाड, तेजस कांडपिळे, अमर पाटील, विकास घरत, प्रविण पाटील, निलेश बाविस्कर, नगरसेविका राजेश्री वावेकर, कुसूम म्हात्रे, तसेच सिडकोचे अधिकारी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून खारघर, कामोठे, कळंबोली, नविन पनवेल येथील काही विभागांमध्ये अत्यंत अनियमित पाणी पुरवठा होत असून नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याने पाणी पुरवठा नियमित होण्याकरिता तसेच भविष्यकालीन पाणी पुरवठयाचे नियोजन करण्यासाठी सातत्याने भाजपाचे विविध नगरसेवक सिडको प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न पत्रव्यवहार व बैठकांच्या मार्फत करीत आहेत. सिडको या महत्वाच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही आणि ही वस्तुस्थिती असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बैठकीत अधोरेखित केले. मी अध्यक्ष पदाच्या कार्यकाळांत देखील याबाबतीत अनेक बैठका घेऊन पाणी पुरवठा नियोजनाबाबत वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. परंतू दुर्देवाने आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे नियोजन सिडकोमार्फत केल्याचे दिसून येत नाही, असे त्यांनी नमूद करत सिडको प्रशासनाच्या या नियोजनशून्य कारभारामुळे ऐन पावसाळ्यांत नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष आहे. वेळीच उपाययोजना न झाल्यांस सिडकोविरोधात नागरिकांच्या असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या भावनांचा विचार करणे क्रमप्राप्त आहे, त्यामुळे सिडकोने तातडीने योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना सूचित केले आहे.
सिडको परिसरात वाढती लोकसंख्या पाहता या ठिकाणी पाण्याचे सोर्सेस वाढविण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याची गरज असल्याचे कैलास शिंदे यांनी मान्य केले असून आवश्यक ठिकाणी नवीन जलकुंभांची उभारणी, जीर्ण पाईपलाईन बदली करण्याचेही काम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर दीर्घकालीन उपाययोजनेसाठी टाटा कन्सलटंट यांचे सहकार्य तसेच स्काडा सिस्टीमची अंमलबजावणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.