कोविडचे निर्बंध पाळून गणेशोत्सव आनंदाने साजरा करू – कु.आदिती तटकरे

0
151

अलिबाग : कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी अधिक काळजी घेऊन उत्साहाने गणेशोत्सव साजरा करू या, असे आवाहन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले.
नियोजन भवन बैठक सभागृहात ” गणेशोत्सव 2021 पूर्वतयारी” बाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख, अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे तसेच महसूल, पोलीस, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, जिल्हा परिषद, राज्य परिवहन अशा विविध शासकीय विभागांचे विभागप्रमुख, कार्यालयप्रमुख आदी उपस्थित होते.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी गणेशोत्सव 2021 च्या तयारीच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, राज्य परिवहन महामंडळ, आरोग्य, पोलीस, अन्न व औषध प्रशासन, कोकण रेल्वे, मेरीटाईम बोर्ड, रस्ते वाहतूक अशा विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रत्येक विभागाने काय तयारी केली आहे, हे जाणून घेतले.
त्यानुषंगाने पालकमंत्री कु.तटकरे यांनी राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना रस्ते दुरूस्ती, रिफ्लेक्टर बसविणे, दिशादर्शक फलक लावणे, आवश्यक त्या ठिकाणी जेसीबी, पोकलेन, डंपर सज्ज ठेवणे याबाबत निर्देश दिले.
महावितरणच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या की, ग्रामपंचायत हद्दीतील पथदिवे त्वरीत सुरू करावेत. ग्रामपंचायतींच्या थकीत देयकांबाबत तात्काळ आढावा घेऊन त्यांना सुधारीत देयके द्यावीत. ज्या ग्रामपंचायतींना अद्याप वीजमीटर बसविण्यात आलेले नाहीत, त्या ग्रामपंचायतींशी समन्वय साधून वीजमीटर बसवून द्यावेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री कु.तटकरे यांनी ग्रामीण भागात ज्या ठिकाणी एसटीच्या फेऱ्या बंद पडल्या आहेत, त्याबाबतीत आढावा घेऊन त्या फेऱ्या पूर्ववत सुरू करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे सूचीत केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची जबाबदारी आपली असल्याने या काळात कोविड चाचणी व कोविड लसीकरण वाढवावे, भाविकांना वैद्यकीय सोयी-सुविधा मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सर्वतोपरी सज्ज राहावे, अशा सूचना त्यांनी आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना केल्या. सण-उत्सवाच्या काळात काही व्यापारी खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करतात. त्यांना आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी मोहीम घेऊन अशा प्रकारे खाद्यपदार्थ, प्रसाद यामध्ये भेसळ होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत सांगितले.
याचबरोबर पालकमंत्री कु.तटकरे यांनी पोलीस विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभागांनी गणेशोत्सव काळात राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरक्षित व सुरळीत सुरू राहील, अपघात होणार नाही, यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, बंदोबस्त चोख ठेवावा, इतर विभागांशी योग्य तो समन्वय राखून भाविकांना गरज पडेल तेव्हा मदत व मार्गदर्शन करावे, अशा सूचना पोलीस विभागाच्या व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी सर्वांसाठी महत्त्वाच्या असलेल्या गणेशोत्सव या सणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक यंत्रणेने आपापसात योग्य तो समन्वय राखावा, प्रत्येक विभागाने आपापली भूमिका जबाबदारीने पार पाडावी, असे आवाहन उपस्थित सर्व अधिकाऱ्यांना केले.
बैठकीच्या समन्वयाची भूमिका निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांनी पार पाडली.