मोरा-भाऊचा धक्का सागरी मार्गावरील तिकिट दरवाढ कायम करण्याची मागणी

0
160
Exif_JPEG_420

मंजुरी दिल्यास दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे कंबरडे मोडणार !

उरण : मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात पावसाळी हंगामात करण्यात आलेली 2 रुपयांची वाढ कायम करण्याची मागणी मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाकडे केली आहे.तिकिट दर कायम करण्यास मंजुरी दिल्यास या सागरी मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे कंबरडे मोडणार आहे.
दरवर्षी 1 जुन ते 31ऑगस्ट या दरम्यानच्या पावसाळी हंगामात मोरा- भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तिकिट दरात भरमसाठ वाढ केली जाते.मागील वर्षीही तिकिट दरात 15 रुपयांची वाढ करण्यात आली होती.त्यामुळे प्रवाशांना तिकिटासाठी 70 रुपये मोजावे लागत होते. यावर्षीही मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने पावसाळी हंगामासाठी तिकिट दरात 70 रुपयांंवरुन 90 रुपयांपर्यंत वाढ केली आहे.
हाफ तिकिट दरातही 33 रुपयांवरुन 44 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ 26 मे पासूनच लागु करण्यात आली होती.आता 1 सप्टेंबर पासून पावसाळी हंगामासाठी करण्यात आलेली तिकिट दरवाढ कायम करण्याची मागणी मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेने मेरिटाईम बोर्डाकडे केली असल्याची माहिती मोरा बंदरचे निरिक्षक प्रभाकर पवार यांनी दिली. मात्र तिकिट दर कायम करण्यास मंजुरी दिल्यास या सागरी मार्गावर दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे कंबरडे मोडणार आहे.
मागील काही वर्षांपासून डिझेल दरात सातत्याने भरमसाठ वाढ होत चालली आहे.68 रुपये प्रति लिटर दराने मिळणाऱ्या डिझेलसाठी आता 90 रुपये मोजावे लागत आहेत.त्यामुळे पावसाळी हंगामासाठी करण्यात आलेली तिकिट दरवाढ कायम करण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक औद्योगिक सहकारी संस्थेचे सचिव शराफत मुकादम यांनी दिली.महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या मंजुरी नंतरच दरवाढ कायम करण्यात येणार असल्याचेही मुकादम यांनी स्पष्ट केले.