महाविकास आघाडीच्या नेत्यांची नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंसोबत बैठक
पनवेल : सह्याद्री अतिथीगृहात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच पालक मंत्री कु आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीच्या पनवेल उरण स्व. दि.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेवून चर्चा केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांसह महाविकास आघाडीचे सर्व नेते उपस्थित राहिले होते. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे कायम करण्याबाबत दस्तुरखुद्द नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे सकारात्मक निर्णय घेत असल्यामुळे स्व. दि.बा.पाटील यांचे स्वप्न महाविकास आघाडी सरकार पूर्ण करून प्रकल्पग्रस्त बांधवांना न्याय मिळवून देणार आहे.
आज पार पडलेल्या या बैठकीसाठी खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळाराम पाटील, पनवेल उरण महाविकास आघाडी समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, पनवेल जिल्हाध्यक्ष आर सी घरत, जिल्हाप्रमुख शिवसेना शिरीष घरत, सचिव प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस प्रशांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, माजी आदर्श नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, प्रीतम म्हात्रे विरोधी पक्षनेते पनवेल, सुदाम पाटील जिल्हा कार्याध्यक्ष, अनिल नाईक जिल्हाध्यक्ष समाजवादी पक्ष, गणेश कडू जिल्हा चिटणीस शेकाप, लीना गरड नगरसेविका, कॅप्टन कलावत उपाध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस यांच्या समवेत श्री फाटक सचिव नगरविकास, भूषण गगराणी सचिव नगरविकास, सिडको व्यवस्थापकीय संचालक श्री. मुखर्जी, सहव्यवस्थापकीय संचालक श्री. शिंदे, पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख तसेच अनेक प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते
गरजेपोटी बांधलेली सर्व बांधकामे नियमित करण्यासाठी आज उच्चस्तरीय बैठक पार पडली. प्रामुख्याने येणाऱ्या काळामध्ये प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली बांधकामे कायमस्वरूपी नियमित करण्यासाठी तोडगा काढण्यासाठी दोन्ही जिल्हाधिकारी यांना निर्देश देऊन सर्व बांधकामे नियमित करण्याच्या दृष्टीने सर्व्हे लवकरात लवकर करून प्रकल्पग्रस्तांनी केलेली जी बांधकामे आहेत ती हद्द निश्चित करून सरकार लवकरच ती सर्व बांधकामे अधिकृत करून तेथील भूमिपुत्रांना न्याय देण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलणार असल्याचे मत यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
सर्व्हे करण्यासाठी येणाऱ्या अधिकारी यांना सहकार्य करून लवकरात लवकर सर्व्हे करून घेण्यात यावे आणि आपला प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा तसेच सर्व्हे झाल्यानंतर सुद्धा सिडको कोणतीही तोडक कारवाई करणार नाही असे अभिवचन एकनाथ शिंदे यांनी उपस्थित शिष्टमंडळास दिले. त्याचप्रमाणे मालमत्ता कर बाबतीत चालू वर्ष पासून कर लावावा व करात आणखी सूट द्यावी ही विनंती महाविकास आघाडीने केल्यानंतर त्यावर देखील लवकरच निर्णय घेण्यात येईल असे मंत्री महोदयांनी संगीतले. प्रास्ताविक करत असताना बबनदादा पाटील यांनी सांगितले की दिवंगत दि बा पाटील साहेब यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचे काम महाविकास आघाडी करणार आहे, तरी गरजेपोटी बांधलेली बांधकामे सर्व नियमित करावी जेणेकरून दिवंगत दि बा पाटील साहेबांना हीच खरी श्रद्धांजली ठरेल.