बंदराची साडेसाती संपेना : बंदराचे भवितव्य अडचणीत !
उरण : प्रतिनिधी
करंजा – रेवस रो-रो प्रकल्पाच्या सदोष व्यवस्थेमुळे दुषित सांडपाणी थेट करंजा मच्छिमार बंदरात मिसळत असल्याने नव्याने पुर्णत्वाच्या मार्गावर असलेले 150 कोटी खर्चाच्या बंदरातुन मासळी निर्यातीसाठी अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे याआधीच अनेक अडथळ्यांच्या शर्यती पार करून नऊ वर्षांपासून रखडत-रखडत सुरू असलेले करंजा मच्छिमार बंदर पुन्हा एकदा अडचणीत आले आहे.
मुंबई येथील ससुनडॉक बंदरावर मासळी उतरविण्यासाठी येणाऱ्या हजारो मच्छीमारांचा होणारा ताण कमी करण्यासाठी 2012 सालापासून करंजा मच्छीमार बंदर उभारण्यात येत आहे. रायगड जिल्हयातील करंजा खाडी किनारी एक हजार मच्छिमार बोटी लागण्याची क्षमतेचे हे अत्याधुनिक बंदर आहे. नऊ वर्षांपासून रखडत रखडत सुरू असलेल्या बंदराच्या कामाचा खर्च 64 कोटी वरुन आता 150 कोटींपर्यंत पोहचला आहे. आधीच रखडलेले बंदर आता पुर्णत्वाच्या मार्गावर असतांनाच बंदराच्या उंचीची समस्या निर्माण झाली आहे. कमी उंचीच्या बंदरामुळे उधाणाच्या भरतीच्या वेळी मच्छिमार बोटी जेट्टीवर आदळून अपघाताचा धोका बळावला आहे.
यावर तोडगा काढण्यासाठी मच्छिमार संस्थेच्या तक्रारीनंतर मत्स्यव्यवसाय विभागाचे प्रयत्न सुरु असतानाच करंजा – रेवस रो – रो प्रकल्पाच्या सदोष सांडपाणी व्यवस्थेमुळे दुषित सांडपाणी थेट नव्याने उभारण्यात येत असलेल्या करंजा मच्छिमार बंदरात मिसळत असल्याने मच्छिमारांसाठी आणखी एक जटिल समस्या निर्माण झाली आहे. दुषित सांडपाण्यामुळे निर्यात होणाऱ्या मासळीच्या शरिरात विषाणू सापडतील. अशी निर्यात होणारी विषाणूयुक्त मासळी आंतरराष्ट्रीय बाजारात विकत घेतली जात नाही.
आयात-निर्यातदारही खरेदी करीत नाहीत .खरं तर मोठ्या प्रमाणात आयात-निर्यात होणाऱ्या मासळीवरच मासळी व्यवसाय टिकून आहे. मात्र भविष्यात नव्याने उभारण्यात येणाऱ्या करंजा मच्छीमार बंदरातील मिळणाऱ्या दुषित सांडपाण्याची समस्या सुरू होण्यापूर्वीच दूर करण्यात आली नाही तर बंदराला मासळी निर्यातीचा परवाना मिळणार नाही. त्यामुळे 150 कोटी खर्चाचे करंजा मच्छिमार बंदर सुरू होण्यापूर्वीच निकामी होईल. कुचकामी ठरेल अशी भीती करंजा मच्छिमार सहकारी संस्थेने याधीच मत्स्यव्यवसाय मंत्री,आयुक्त, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
करंजा – नवापाडा किनाऱ्यावर रो-रो सेवेसाठी रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र रस्ता तयार करताना दुषित सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी रो-रो बंदराच्या झीरो पॉईंटपर्यंत गटार व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. मात्र मुंबई मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे करंजा-नवापाडा येथील तीन हजार लोकवस्तीच्या गावातील दुषित सांडपाणी थेट नव्याने उभारण्यात येत असलेल्या आणि पुर्णत्वाच्या मार्गावर असलेल्या
करंजा मच्छिमार बंदरात मिसळत आहे. बंदर सुरू झाल्यानंतर बंदरात येणाऱ्या मच्छीमार मासळी धुण्यासाठी बंदरातील या दुषितयुक्त सांडपाण्याचाच अधिक वापर करणार आहेत.या दुषित सांडपाण्यामुळे मात्र मासळीही दुषित होणार आहे.
त्यामुळे आयात- निर्यात होणाऱ्या अशा मासळीच्या शरिरात विषाणू आढळून आल्यास आयात-निर्यातदार मासळीची खरेदी करणार नाहीत. याआधीच अशा प्रकारामुळे मुंबईच्या ससुनडॉक बंदराच्या नावावर मासळी निर्यातीला पाबंदी आहे. परिणामी भविष्यात करंजा बंदरावरही मासळी निर्यातीसाठी पाबंदी येईल. त्यामुळे हजारो मच्छीमारांसाठी वरदान ठरणारे करंजा मच्छीमार बंदर सुरू होण्यापूर्वीच अडचणीत येईल. 150 कोटी खर्चाचे बंदरही मच्छिमारांसाठी निकामी ठरेल. दुषित सांडपाण्याची समस्या बंदर कार्यान्वित होण्यापूर्वीच दूर करण्यासाठी केंद, राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
भालचंद्र कोळी
चेअरमन
करंजा मच्छिमार सहकारी संस्था