उरण : प्रतिनिधी
जेएनपीटी हे कंटेनर हाताळणी करणारे देशातील आघाडीचे बंदर आहे. ऑगस्ट महिन्यात जेएनपीटी मध्ये कार्गो हाताळणीत उल्लेखनीय वाढ झाली असून या महिन्यात एकूण 453,105 टीईयूची हाताळणी नोंदवली गेली जी ऑगस्ट 2020 मधील 352,735 टीईयूच्या तुलनेत 28.45 टक्के अधिक आहे. जेएनपीटी मधील एनएसआईजीटी ने ऑगस्ट 2021 मध्ये 98,473 टीईयूची हाताळणी केली गेली जी एनएसआईजीटीच्या स्थापनेनंतरची आजवरची सर्वाधिक आहे.आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या पाच महिन्यांत जेएनपीटीमध्ये 2,250,943 टीईयू कंटेनर वाहतूक हाताळणी केली गेली जी मागील वर्षीच्या याच कालावधीत हाताळणी केलेल्या 1,544,900 टीईयूच्या कंटेनर वाहतुकीपेक्षा 45.70 टक्के अधिक आहे.
आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या पाच महिन्यांत जेएनपीटीमध्ये एकूण 30.45 दशलक्ष टन वाहतूक हाताळणी झाली जी मागील वर्षी याच कालावधीत हाताळणी केलेल्या 21.68 दशलक्ष टनांपेक्षा 40.42 टक्के अधिक आहे.जेएनपीटी बंदरात ऑगस्ट 2021 दरम्यान 500 रेल्वे रेकच्या माध्यमातून 79,583 टीईयू आईसीडी वाहतूक हाताळणी झाली. अशाप्रकारे आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या पाच महिन्यात (एप्रिल ते ऑगस्ट) बंदराच्या कामकाजात रेल्वेचा वाटा 18.27 टक्के राहिला आहे. जेएनपीटी बंदरात रेल्वेच्या एकूण कामगिरीत सुधारणा होण्यामध्ये रेल्वे आणि सर्व पोर्ट टर्मिनल्ससह सर्व भागधारकांची कार्यक्षमता आणि समन्वय, सर्व कंटेनर ट्रेन ऑपरेटर (दोन्ही कॉनकॉर आणि प्रायव्हेट सीटीओ) यांचे महत्वपूर्ण योगदान आहे.
ऑगस्ट 2021 मध्ये सुद्धा आम्ही आमच्या कामगिरीचा आलेख चढ़ताच ठेवला आहे. आमच्या कामगिरीमध्ये होत असलेली एकूण वाढीची वाटचाल अधिक अनुकूल आहे. कोविड महामारीचा सामना कारण्यासाठीच्या आमच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आम्ही महामारी दरम्यान जगभरातून मदत स्वरूपात आलेल्या सर्व कोविड मदत सामग्री अर्थात वैद्यकीय कार्गो आणि उपकरणांच्या हाताळणीस सर्वोच्च प्राधान्य दिले. आम्ही आमच्या कोविडपूर्व कामगिरीच्या पातळीवर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे आणि आमच्या कामगिरीच्या आकडेवारीवरुन हे स्पष्ट होते की, भविष्यातही आमच्या कामगिरीचा आलेख चढ़ताच राहील. आम्ही आमच्या सर्व भागधारकांसह एकत्र काम करून, आमच्या कामगिरीचा चढ़ता आलेख कायम ठेवण्यासाठी आशावादी आहोत. देशातील व्यापारास प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, आम्ही सदैव आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करीत आमची प्रचालन कार्यक्षमता आणि बंदराच्या क्षमतेमध्ये सतत वाढ करण्याचा प्रयत्न करत असल्याचे जेएनपीटी अध्यक्ष संजय सेठी यांनी म्हटले आहे.
गेल्या महिनाभरात, सस्टेनबिलिटी व हरित बंदर उपक्रमांतर्गत आम्ही अनेक महत्वाचे उपक्रम राबविले आहेत. यामध्ये प्रामुख्याने नऊ विद्युत वाहनांचा वापर आणि बंदराच्या प्रचालन क्षेत्रामध्ये एक समर्पित चार्जिंग स्टेशन सुरू केले आहे. शिवाय, जेएनपीटीच्या घनकचरा व्यवस्थापन संयंत्रात बायोगॅसवर आधारित वीजनिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. त्याचबरोबर बंदर परिसरातील रिअल-टाइम हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण करण्यासाठी एक समर्पित वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. बंदराची कनेक्टिव्हिटी सक्षम व सुगम करण्यासाठी एलएचएस – लेन आरओबी चा दुसरा टप्पा आणि जेएनसीएच-पीयूबीच्या मागच्या बाजुकडील रस्त्यासह अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत.भविष्यात ही जेएनपीटी देशातील पुरवठा साखळीचा अविभाज्य भाग म्हणून आपली कर्तव्ये पार पाडत देशाच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत राहील.