Home  ताज्या बातम्या  सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळाचे 9 ऑक्टोबर रोजी उद्घाटन – उद्योगमंत्री सुभाष देसाई  
            
                                        
                            
                                
    
        
        
        
            
            मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयनमंत्री ज्योतीरादित्य शिंदे उपस्थितीत राहणार कोकणविकासास चालना
         मुंबई : कोकणच्या पायाभूत सुविधांमध्ये भर टाकणारे आणि विकासाला चालना देणारे सिंधुदुर्गचे चिपी विमानतळ लवकरच खुले होणार आहे. दि. 9 ऑक्टोबर 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतीरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी सांगितले, उद्योग विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एम आय डी सी) हा प्रकल्प हाती घेऊन आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करुन विमानतळाचे काम पूर्ण केले आहे. एकुण 286 हेक्टर जमिन या प्रकल्पासाठी संपादित केली. सुमारे 520 कोटी रुपयांचा खर्च असलेल्या या प्रकल्पासाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. आय आर बी, सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा. लि. यांना विमानतळ उभारणी, फायनान्स तसेच ऑपरेशन्स (DBFO) साठी लीजवर हे काम देण्यात आले आहे. त्यांनी हा खर्च केला आहे. विमानतळ कार्यान्वित होण्यासाठी लागणा-या पाण्याचा पुरवठा, रस्ते विकास, संरक्षण भींत या सारखी कामे एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून 14 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.
विमान पत्तन प्राधिकरण,(Airport Authority of India) नागर विमानन महानिदेशालय (DGCA) यांच्यातर्फे लागणारे सर्व परवाने प्राप्त झाले आहेत. विमानतळासाठी विकासकरार झाले आहेत. या विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विमानतळामुळे कोकणाच्य विकासाला चालना मिळेल, पर्यटन व्यवसाय विस्तारण्यास मदत होईल. कोकणाचे आकर्षण असलेल्या समुद्रापर्यंत आता विमानवाहतुक सुरु झाल्यामुळे अधिकाअधिक पर्यटकांना पोहचता येईल. कोकणवासियांची उत्कर्षाकडे वाटचाल सुरु असल्याचे श्री. देसाई यावेळी म्हणाले.