नवीन पनवेल : पनवेल तालुक्यातील वाजे कुंडी धबधब्यात बुडून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नऊ सप्टेंबर रोजी घडली आहे. आदित्य दामोदर जनार्दन असे या मयत तरुणाचे नाव असून तो कळंबोली येथे राहणार आहे.
आदित्य हा त्याच्या मित्रांसोबत पनवेल तालुक्यातील वाजे जवळील कुंडी धबधब्यावर गेला होता. दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास तो काठावर बसला होता. यावेळी पाय घसरून तो खाली पडला. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना तरूण बुडाल्याची माहिती दिली. सिडको येथील अग्निशामक दल, तालुका पोलीस आणि वाजे येथील सत्यवान शिरीष पाटील, देविदास लहू पाटील यांच्या मदतीने या तरुणाचा मृतदेह कुंडी धबधब्यातून बाहेर काढण्यात आला. यापूर्वी देखील जुलै महिन्यात कुंडी धबधब्यात बुडून १९ वर्षीय मोसिन मोगल ( मुंबई) याचा मृत्यू झाला होता
गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे त्यामुळे पर्यटक मोरबे, गाढेश्वर, वाजे गावातील कुंडी धबधब्याकडे जात असतात. मात्र पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू होतो. पर्यटकांनी या परिसरात जाऊ नये असे आवाहन पोलीस वारंवार करतात मात्र पोलिसांचे न ऐकता पर्यटक आपला जीव गमावतात.