तळोजा जेलमधून आरोपीचे पलायन

0
383

पनवेल : भांडुप येथील एका अल्पवयीन मुलाच्या हत्या प्रकरणात तळोजा जेलमध्ये कैदेत असलेल्या संजय यादव (28) नामक आरोपीने जेलमधील गार्डची नजर चुकवून 25 फुट उंच असलेल्या जेलच्या सुरक्षा भिंतीवरुन उडी टाकून पलायन केल्याची घटना घडली आहे. या आरोपीचा पोलिसांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्यामुळे या आरोपीसह त्याच्यासोबत जेलमधून पळून जाताना पकडल्या गेलेल्या आरोपीविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटनेत पळून गेलेला आरोपी भांडूप येथे राहण्यास असून 2018 मध्ये भांडूपमध्ये झालेल्या एका 17 वर्षीय मुलाच्या हत्या प्रकरणात संजय यादव याला भांडूप पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर संजय यादव याची तळोजा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. आरोपी संजय यादव आणि राहुल जैस्वाल दोघेही औषध घेण्याच्या बहाण्याने आपल्या बॅरिकेटमधून बाहेर पडले होते. त्यानंतर दोघेही जेलमधील रुग्णालयाजवळ गेले असताना, तेथील वॉच टॉवरवर गार्ड नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे दोघेही वॉच टॉवरच्या जाळीचा दरवाजा उघडून वॉच टॉवरवर चढले. त्यानंतर संजय यादव याने सदर वॉच टॉवरला लागून असलेल्या तळोजा जेलच्या 25 फुट उंच भिंतीवर चढून तेथून त्याने बाहेर उडी टावून पलायन केले. यावेळी त्याच्यासोबत असलेला राहुल जैस्वाल भिंतीवरुन उडी टाकण्यास घाबरल्याने तो वॉच टॉवरवर थांबला. सदर प्रकार वॉच टॉवरवर तैनात असलेल्या गार्डच्या निदर्शनास आल्यानंतर त्याने तत्काळ राहुल जैस्वाल याला पकडले. तसेच पळून गेलेल्या संजय यादव याची माहिती जेल प्रशासनाला दिली. त्यानंतर जेल मधील सुरक्षारक्षकांनी भिंतीवरुन उडी टाकून पळून गेलेल्या संजय यादव याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांना सापडला नाही. त्यानंतर पोलिसांनी संजय यादव राहत असलेल्या भांडूप येथील घरी जाऊन त्याचा शोध घेतला. मात्र, सदर ठिकाणी देखील तो सापडला नाही. त्यामुळे तळोजा जेल प्रशासनाच्या वतीने पळून गेलेला आरोपी संजय यादव आणि त्याच्यासोबत पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला राहुल जैस्वाल या दोघांविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.