सोमवारपासून सुरू होणार कडक अंमलबजावणी
पनवेल ः पनवेल शहर व आजूबाजूच्या परिसराचा झपाट्याने विकास होत असून लोकसंख्येतही प्रचंड वाढ झालेली आहे. त्याचाच परिणाम वाहनांच्या संख्येतही झाला असून पनवेलमधील नागरिक वाहतूक कोंडीने प्रचंड त्रस्त झाले आहेत. त्या दृष्टीने उपाय योजना करण्यासाठी पनवेल वाहतूक शाखेतर्फे प्रयत्न सुरू असून सोमवार 27 सप्टेंबरपासून उरण नाक्याकडून टपाल नाक्याकडे येणार्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे.
पनवेलमधील उरण नाका, टपाल नाका परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. उरण नाका ते टपाल नाका परिसरात मच्छिमार्केट तसेच अन्नधान्याची मोठी व्यापारी दुकाने असून संपूर्ण तालुक्यातून तसेच ग्रामीण भागातून येणार्याा नागरिकांचा मोठा रेटा या परिसरात असतो. त्यामुळे येथे सतत वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना दररोज प्रचंड नाहक त्रास होत आहे. ते रोखण्यासाठी तसेच पनवेलमधील वाहतुकीमुध्ये सुसूत्रता आणण्याचे प्रयत्न वाहतूक शाखेतर्फे सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून टपाल नाका ते उरण नाका हा मार्ग एक दिशा मार्ग करून उरण नाक्याकडून टपालनाक्याकडे येणार्या सर्व वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. फक्त दुचाकींना यामध्ये सुट देण्यात आली आहे. तसेच पंचरत्न चौक, मोमीनपाडा मस्जिद मार्गे ते टपाल नाका या मार्गावर सोमवारपासून सम विषम पार्कींगची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण काही अंशी कमी होवून नागरिकांना दिलासा मिळू शकेल.
प्रायोगिक तत्वावर पंचरत्न चौक, मोमीनपाडा मार्गे टपाल नाका या एकाच मार्गावर सम विषम पार्कींग सुरू करत असून हळुहळू संपूर्ण पनवेलमध्ये वाहतूक व्यवस्थेमध्ये सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न राहील. तरी नागरिकांनी दररोज होणार्या वाहतूक कोंडीसाठी नव्याने करण्यात आलेल्या नियमांचे पालन करून पनवेल वाहतूक शाखेला सहकार्य करावे.
संजय नाळे, वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक, पनवेल