बलात्कार झाल्याचा आरोप करणारी महिलाच निघाली आरोपी, खालापूर पोलिसांचा भांडाफोड

0
186

खालापूर :
माझ्यावर दोन जणांनी फसवून बलात्कार केला आहे म्हणून न्याय मागाला आलेली महिलाच आरोपी असल्याची धक्कादायक घटना खालापूर पोलीस ठाण्यात घडली असून या महिले सोबत असणाऱ्या पाच जणांच्या टोळीला खालपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत या रेप केस चा तपास पोलिसांनी करत खऱ्या गुन्हेगारांचा भांडाफोड करीत त्यांच्या मुसक्या आवळल्याने खालापूर पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महिलांवरील अत्याचार हा विषय सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर गाजतो आहे. साकिनाका येथील महिलेवरील बलात्कार व खून या प्रकरणानंतर तर विरोधकांनी सरकारला अक्षरशः आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याचे पहावयास मिळत आहे व महिला सुरक्षा या विषयावर दोन दिवसाचे विशेष अधिवेशन घ्यावे अशी सूचना दस्तुरखुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्याना केलेली आज सर्वानी पाहिली. महिलांचा अत्याचाराबाबत विषय आला की पोलीस ही त्यावर संवेदनशीलता दाखवत तपास करतात तर याच गोष्टीचा फायदा काही महिला घेत समाजात फायदा उठवतात व महिलांच्या आडून काही गुन्हेगार आपली पोळी ही भाजतात.असाच काहीसा प्रकार खालापूर मध्ये घडला असून त्याचा भांडाफोड खालापूर पोलिसांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार 5 जून 2021 रोजी एक महिला खालापूर पोलिसठाण्यात आली व तिच्यावर दीड वर्षांपूर्वी म्हणजे फेब्रुवारी2020 मध्ये दोन जणांनी बलात्कार केल्याची तक्रार तिने दिली.ती मुलाची राहणारी नाशिक च्या पंचवटी येथील तिला सोन्याचांदीच्या दुकानात नोकरीस लावतो म्हणून तिला दुकान दाखवतो असा बहाणा करून तिला इकडे आणले व खालापूर ते चौक च्या दरम्यान गाडीतून जात असताना अंधारात गाडी थांबवून बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला व तिचे नग्न फोटो काढून कोणाला बोललीस तर व्हायरल करू अशी धमकी दिली.अशी हकीकत तिने सांगून त्या दोन जणांची नावे तिने पोलिसांनी सांगितली. ती महिला असल्याने तिची फिर्याद नोंद करून खालापूर पोलीस तपासाला लागले. त्या महिलेने सांगितलेले आरोपी महालिंग जंगम व राजाराम गोगावले या दोघांना पोलिसांनी पुण्यातून अटक करून तपासासाठी खालापूर ला आणले तेव्हा त्यांनी पोलिसांना सांगितले की पुण्यातील दिलिप साहेबराव यादव याचे बरोबर त्यांचा व्यावसायिक व आर्थिक वाद झाला होता व त्यांच्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार ही केली होती त्या अनुषंगाने दिलीप यादव ला अटक ही झाली होती त्याचा राग धरून त्यानेच आम्हाला फसवायाचे हे षडयंत्र रचले असावे व तक्रारदार महिलेस ते ओळखत ही नाही व कधी पाहिलेलेही नाही. त्यामुळे पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली व त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला.
सदरचा गुन्हा एक वर्ष तीन महिने आधी घडला असल्याने तसा ठोस पुरावा पोलिसांना मिळत नव्हता तेव्हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक तंत्राचा वापर करीत गुन्ह्याचा तपास खालापूर पोलिसांनी सुरू केला व तांत्रिक बाबींच्या कड्या जुळवता जुळवता खरे सत्य पोलिसांच्या समोर येऊ लागले व असे निष्पन्न झाले की पुण्याचा दिलीप यादव व सुमित सापते कल्याणचा बंटी उर्फ श्रीकांत गोंधळ, आणि मुंबईच्या परेलचे प्राची पवार व वैभव वीरकर यांनी कट रचून या तक्रारदार मुलीच्या आर्थिक परिस्तितीचा फायदा घेत तिला पैशाचे अमिश देत महालिंग जंगम व राजाराम गोगावले यांच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करायला लावला होता. आणि तसा जबाब त्यामुलीने खालापूर पोलिसांना दिला आणि तसा क्लोजर रिपोर्ट खालापूर पोलीस कोर्टात सादर केला.
या पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टची प्रत म्हणजे एकंदरीत खोटी फिर्याद दाखल केल्याची प्रत महालिंग जंगम ने कोर्टाकडून मिळवली व त्यानंतर दिलीप यादव याने त्याच्याकडून सोन्याचे दागिने बनवून घेतले व पैसे देण्यास टाळाटाळ केली व पैसे मागण्यास गेले असता आणखी पैसे गुंतवा, पैसे डबल करून देतो,जमीन खरेदी करून देतो,सोन्याचांदीचे दुकान सुरू करून देतो असे सांगून आणखीन पैसे लुबाडले तसेच पुणे पोलिसात केलेली मागे घ्यावी म्हणून दिलीप यादव याने माझ्या विरुद्ध कट रचला व साथीदारांच्या मदतीने माझी बदनामी व्हावी म्हणून एका महिलेस माझ्याविरुद्ध खोटी तक्रार द्यायला लावली अशी तक्रार महालिंग जंगम याने खालापूर पोलीस ठाण्यात दिली व त्यानुसार भा द वी स कलम 420.406.194.195 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्यातील आरोपी नाशिक, पुणे, मुंबई, कल्याण अश्या विविध ठिकाणाचे राहणारे असल्याने त्यांना अटक करणे कठीण काम होते कारण एकास अटक झाली असती तर बाकीचे खबरदार होत फरार झाले असते त्यामुळे खालापूरचे पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी पोलीस अधीक्षक अशोक दुधे. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला यांच्या सुचने नुसार पोलिसांची चार पथके तयार केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड,शेखर लव्हे, पोलीस उपनिरीक्षक बजरंग राजपूत, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती काळे, पोलीस हवालदार प्रसाद पाटील, निलेश कांबळे, अमित सावंत, पंकज खंडागळे, पोलीस नाईक सचिन व्हसकोटी, रणजित खराडे, मनोज सिरतार, ज्ञाणेशवर सहाणे, महिला पोलीस कर्मचारी हेमा कराळे, प्रतीक्षा म्हात्रे, लतिका गुरव, दिक्षिता पवार या सहकाऱ्यांची विभागून चार पथके तयार केली व सर्व आरोपींना एकाच वेळी अटक करायचे ठरवले. त्यानुसार दोन पथके पुण्याला व एक पथक मुंबई आणि एक कल्याण ला रवाना झाले. चार ही ठिकाणी सापळा लावण्यात आला आणि एकाच वेळी पाच ही जण म्हणजे पुण्यातून दिलीप यादव व सुमित सापते तर मुंबई मधून प्राची पवार व वैभव वीरकर यांना आणि कल्याण मधून बंटी उर्फ श्रीकांत गोंधळी यास ताब्यात घेऊन खालापूर ला आणण्यात आले. आज त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता पुढील तपासासाठी न्यायालयाने 24 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.तर ती तथाकथित पीडित महिला हिस अजून नाशिक हुन अटक करणे बाकी आहे असे खालापूर पोलिसांनी सांगितले.