पनवेल मध्ये मोठ्या संख्येने वृद्धाश्रमातील रहिवासी लसींच्या प्रतीक्षेत
पनवेल : कोविड वर अद्याप रामबाण औषध सापडले नाही. केंद्र सरकारचे आरोग्य विभाग,टास्क फोर्स ,डब्लुएचवो आदींनी सुचविलेल्या औषधोपचाराचा फॉर्मूलानुसार कोविड रुग्णांवर उपचार सुरु आहे. मात्र जो पर्यंत कोविडवर ठोस उपाययोजना राबविता येत नाही.तो पर्यंत लसीकरणाकडे एकमेव पर्याय म्हणुन पाहिले जात आहे.मात्र लसीकरणासाठी सक्तीचे असलेले आधार कार्ड बहुतांशी नागरिकांकडे उपलब्ध नसल्याने विशेषतः अनाथाश्रमातील वृद्धांचे लसीकरण मोठ्या प्रमाणात रखडले आहे.
पनवेल तालुक्यात महानगरपालिका तसेच ग्रामीण भागात मोठ्या संख्येने अनाथआश्रम तसेच वृद्धाश्रम आहेत. यापैकी पालिका क्षेत्रातील वृध्दाश्रम व अनाथाश्रम मध्ये पालिकेने पुढाकार घेऊन लसीकरण केले आहे. ग्रामीण भागात देखील आरोग्य विभागामध्ये लसीकरणाचे काम आरोग्य अधिकारी डॉ सुनिल नखाते यांच्या मार्गदर्शनाने उत्तम रित्या पार पडले आहे. मात्र तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोणतीही ओळखपत्रे नसलेले जेष्ठ नागरिक,मानसिक आजाराने त्रस्त असलेले नागरिक आदींचा समावेश आहे. कोणीही वारस नसलेले शेकडो जेष्ठ अथवा तरुणांना त्या काळच्या परिस्थितीनुसार काही नागरिकांनी वृद्धाश्रम अथवा अनाथाश्रमात दाखल केले. संबंधितांकडून स्वतःची ओळखही सांगता आली नसल्याने अशा शेकडो नागरिकांचे कोणतीही ओळख वृद्धाश्रमाकडे नाही. कोविड काळात अनेकांना या आजाराची लागण झाली काही जण यामधून सुखरूप बाहेर पडले.मात्र त्या नंतर कोविड लसीकरणासाठी आवश्यक असलेले आधारकार्डच उपलब्ध नसल्याने अशा नागरिकांचे मोठ्या संख्येने लसीकरण रखडले आहे. नेरे माथेरान मार्गावर असलेले करुणेश्वर वृद्धाश्रम हे यापैकी एक आहे.याठिकाणी सध्याच्या घडीला 35 वृद्ध वास्तव्यास आहेत.यापैकी 10 वृद्धांचे ओळखपत्र उपलब्ध असल्याने या वृद्धांचे लसीकरण जवळील नेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात पार पडले आहे. मात्र जवळ पास 20 ते 25 वृद्धांचे कोणतेच ओळखपत्र यामध्ये आधार अथवा इतर ओळखपत्र उपलब्ध नसल्याने हे वृद्ध लसीकरणापासून वंचित राहिले असल्याचे माहिती करुणेश्वर वृद्धाश्रमाचे संचालक संतोष ढोरे यांनी दिली.
करुणेश्वर वृध्दाश्रमासह तालुक्यातील आणखीही वृद्धाश्रमातील लसीकरण रखडले आहे. याबाबत शासकीय पातळीवर पुढाकार घेऊन लसीकरण करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तालुक्यातील कोंडले गावातील समाजसेवक रवींद्र पाटील यांनी याबाबत शासनाकडे वृद्धाश्रमातील अशा नागरिकांचे लसीकरण करण्याची मागणी केली आहे.
वृद्धाश्रमातील विना ओळखपत्र असलेल्या नागरिकांची लसीकरण मोहीम आम्ही यशस्वीपणे राबविली आहे. ज्या वृधाराश्रमातील वृद्धांचे लसीकरण रखडले आहे. अशा वृद्धाश्रम अथवा अनाथाश्रमांनी जिल्हा आरोग्य विभागाशी संपर्क साधल्यास जिल्हा आरोग्य विभागामार्फत सर्व प्रक्रिया पूर्ण करून अशा नागरिकांचे लसीकरण करता येईल.
-डॉ सुनील नखाते (तालुका आरोग्य अधिकारी ,पनवेल )