भाजप आमचा दुश्मन नसून राजकीय विरोधक- खा.सुनील तटकरे

0
167

पनवेल :

           पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद आणि संघटनात्मक कामांच्या आढाव्यासाठी आज (शुक्रवार दि.१ ऑक्टोबर) कळंबोली येथे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतिश पाटील, प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, शहर कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, विजय खानावकर, दर्शन ठाकूर यांच्यासह तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

        या बैठकीदरम्यान प्रभागनिहाय संघटनांच्या अध्यक्षांची नियुक्ती, प्रभागनिहाय महिला, युवक, युवती, सामाजिक न्याय सेल यासारख्या विभिन्न सेलच्या अध्यक्षांची नियुक्ती, पनवेलच्या ग्रामीण भागात समाविष्ट ८ जिल्हापरिषद मतदारसंघाच्या अध्यक्षांची नियुक्ती, १६ पंचायत समिती मतदारसंघाच्या अध्यक्षांची नियुक्ती त्याचप्रमाणे पनवेल व उरण विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या मतदान केंद्रनिहाय बूथ कमिट्यांची नियुक्ती करणे अशा विविध संघटनात्मक कामांविषयी चर्चा करण्यात आली. पुढील १५ दिवसांमध्ये संघटनात्मक नियुक्तीच्या बाबतीत पदाधिकाऱ्यांनी त्या त्या प्रभागांमध्ये जाऊन बैठकांचे आयोजन करून चर्चात्मक संवाद साधावा, अशा सूचना खासदार सुनील तटकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना याबैठकीदरम्यान दिल्या.

         आगामी महापालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एक सक्षम पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व निवडणुकांना सामोरे जाईल असा विश्वास खा.सुनील तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून पनवेल, उरण मतदारसंघात निवडणुकीचे धोरण, जाहीरनामा, पक्षीय जागांचे वाटप याबाबतचे योग्य निर्णय योग्य वेळी घेतले जातील असेही खा.सुनील तटकरे यावेळी म्हणाले.

         खा.तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, २०१७ च्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती व संघटनात्मक बांधणी अतिशय उत्तम पद्धतीने सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातील. देशासह राज्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व राष्ट्रीय नेते शरद पवार साहेबांच्या विचारांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे. शरद पवारांना मानणाऱ्या मतदारवर्गाच्या वलयाचा फायदा महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना सुद्धा व्हावा. आगामी निवडणुकांमध्ये ज्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस बळकट असेल त्याठिकाणच्या जागा स्वाभाविकपणे आम्ही लढवणार, मात्र उरलेल्या इतर जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शरद पवार साहेबांचे नेतृत्व म्हणून या परिसरातील भाजपची सत्ता घालवून महाविकास आघाडीची सत्ता येण्यासाठी जेवढे प्रयत्न करावे लागेतील तेवढे टोकाचे प्रयत्न केले जातील.

भाजप आमचा दुश्मन नसून राजकीय विरोधक-

       पक्षाच्या ध्येयधोरणानुसार भाजप आमचा राजकीय विरोधक असेल, मात्र राजकीय दुश्मन म्हणता येणार नाही. राजकारणामध्ये दुश्मनी हा भाग नसून पक्षाच्या विचारधारेवर आधारित भाजप आमचा प्रमुख विरोधीपक्ष आहे, असे प्रतिपादन खा.सुनील तटकरे यांनी यावेळी केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. तरीदेखील स्थानिक पातळीवर समज-गैरसमज अथवा मतमतांतरे असल्यास एकत्ररित्या बसून चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.