पनवेल : हरेश साठे
कोरोना महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडले आणि जगासमोर मोठे संकट आले, अशा परिस्थितीत लोक संख्येचा विचार करता आपल्या भारत देशावर त्याचा मोठा दुष्परिणाम झाला असता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योग्य निर्णय आणि उपाययोजनांमुळे कोरोनाच्या संकटकालातही देशाला सावरले आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या आरोग्याची काळजी घेणारे नेतृत्व आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज (शनिवार, दि. ०२ ऑक्टोबर) खांदा कॉलनी येथे केले.
सेवा व समर्पण अभियान अंतर्गत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि कॅन्सर पेशंट्स ऐड असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सीकेटी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या गर्भाशय मुखाच्या कॅन्सरवर प्रतिबंधात्मक लसीकरण महाशिबिराचे उदघाट्न केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी कोरोना योद्धांचा सत्कार तसेच अपंगांना तीन चाकी सायकलचे वाटप करण्यात आले. त्यावेळी त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
गर्भाशय मुखाच्या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी एचपीव्ही नामक चाचणी करावी लागते आणि ही चाचणी महागडी असल्याने महिला याकडे दुर्लक्ष करतात.बाजारात या एका चाचणीसाठी सुमारे सात ते नऊ हजार रुपयांचा खर्च येतो.जागतिक आरोग्य संघटना (WHO)च्या अहवालानुसार गर्भाशयमुखाचा कॅन्सर हा एचपीव्हीच्या ‘हाय रिस्क’ प्रकारच्या विषाणूमुळे होतो. महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाण असलेल्या कॅन्सरमध्ये या कॅन्सरचा चौथा क्रमांक लागतो. महिलांमध्ये धडकी भरवणारा सर्व्हिकल म्हणजेच गर्भाशय मुखाचा कॅन्सर ही जगभर मोठी समस्या आहे. या कॅन्सरच्या निर्मूलनासाठी या लसीकरण महाशिबिराचे दोन दिवस आयोजन करण्यात आले असून या महाशिबिरात किमान ०१ हजार मुलींचे लसीकरण होणार आहे.
नामदार भारती पवार यांनी पुढे म्हंटले कि, कर्करोगाचे वेगळे प्रकार आणि वेगवेगळ्या देशात संख्याचे प्रमाण वेगवेगळे आहे. त्यामुळे त्याप्रमाणे त्यावर उपचार यंत्रणा राबविली जाते. भारतात कर्करोगाचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच त्यावेळी तात्काळ उपचार करणे गरजेचे असून त्यासाठी जनजागृती महत्वाची आहे. महिला आरोग्यदायी तर कुटूंब सुदृढ अशी संकल्पना सत्यात आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेने याबाबतीत जागरूक राहणे गरजेचे असून या त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून केंद्र सरकार योग्य ती उपाययोजना करीत आहे. कोरोनाच्या काळात सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा विचार करत कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यावर भर दिला. देशातील नागरिकाला मोफत लस देण्यासाठी त्यांनी ३५ हजार कोटी रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून दिले. आणि आपला भारत देश ८९ कोटी लसीकरण करणारा अव्वल ठरला. कोरोना महामारी विरोधात लढताना कर्करोग तसेच क्षयरोग दूर करण्यासाठी केंद्र सरकारचे आरोग्य विभाग कार्य करत आहे, त्याचबरोबर आयुष्यमान भारत योजनेच्या अनुषंगाने ५० कोटी लाभार्थी असून ०२ कोटी नागरिकांनी त्याचा लाभही घेतला आहे. आरोग्य सेवेच्या दृष्टिकोनातून देशात ,मेडिकल कॉलजचे प्रमाण वाढले आहे आणि एकेकाळी सहा एम्स होत्या पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टिकोनातून बावीस एम्स निर्माण झाले आहेत. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात दिवसेंदिवस आपला देश प्रगती करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य सेवेचा वसा वृद्धिंगत करण्यासाठी आणि भारताच्या विकासासाठी ‘सबका साथ, सबका विश्वास, आणि सबका प्रयास’ महत्वाचा आहे असेही त्यांनी सांगितले. कोरोना काळात देशाच्या सीमेवर असलेल्या सैनिकांप्रमाणे कोरोना योद्धांनी काम केल्याचे सांगत त्यांच्याप्रती आदर व अभिमानही त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच सेवा अभियानातून विविध आरोग्य उपक्रम राबवित जीवांचे रक्षण करण्याचे काम होत असल्याचे अधोरेखित केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे समाजाप्रती असलेले योगदानाचा आढावा घेतला तर त्यांच्याविषयी बोलायला वेळ कमी पडेल. प्रचंड सामाजिक कार्याची जोड त्यांच्याकडे आहे. सतत समाजाची सेवा करण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून नेण्याचे काम केले आहे.
– नामदार भारती पवार
कोरोना योद्धा सन्मान – डॉ. गिरीश गुणे, डॉ. संतोष जाधव, डॉ. चंद्रकांत शिंदे, डॉ. विशाल किणी, डॉ. माधुरी दांडेकर, डॉ. आशिष गांधी, डॉ. हेमंत इंगळे, डॉ. अमित मायकर
अंत्यविधी सेवक सन्मान – विनायक शेळके, दिलीप पाटील, नितीन करके, रमेश आखाडे, यज्ञेश सोनके.