अल्पदरात दिवाळी फराळाच्या साहित्याची विक्री, जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्ट व शेकापचा पुढाकार

0
168

       पनवेल : लॉकडाऊनमुळे अनेक कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलमडल्यामुळे यंदा दिवाळीत खरेदी करण्यासाठी अनेकांपुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या अनुषंगाने गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांसाठी यंदाची दिवाळी गोड व फराळासहित साजरी व्हावी, हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून शेतकरी कामगार पक्ष व जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर नामांकित व उच्च प्रतीच्या दिवाळी फराळाच्या साहित्याची विक्री केली जात आहे.  सातत्याने गेल्या ५ वर्षांपासून हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत असून यंदाही पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शुक्रवारपासून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेविका प्रीती जॉर्ज, नंदू भोईर, गणेश म्हात्रे, हरीश मोकल, चेतन शहा, अविनाश मकास, रोहन गावंड, शिवराज साखरे आदी उपस्थित होते. दिवाळीच्या फराळासाठी आवश्यक असलेले जिन्नस याठिकाणी बाजारभावापेक्षा कमी दरात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. एक किलो साखर, अर्धा किलो रवा, अर्धा किलो मैदा या तीन वस्तूंची बाजारपेठेत किंमत जवळपास १३५ रुपये इतकी आहे. परंतु या उपक्रमाअंतर्गत विक्रीसाठी ठेवलेल्या या तिन्ही जिन्नसांची किंमत अवघी ८० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. म्हणजेच नागरिकांना यातून ५५ रुपयांची सूट देण्यात आली आहे. पनवेल-उरणमधील जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, अशी विनंती पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते तथा जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रितम म्हात्रे यांनी केली आहे. या उपक्रमाअंतर्गत सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी गोड व्हावी, हा एकमेव हेतू असल्याचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी सांगितले.