वंचितांना अधिकार मिळवून देण्यासाठी जागृती आवश्यक – वरिष्ठ न्यायमूर्ती ए.ए. सय्यद

0
127

अलिबाग :  संविधानाने सर्वांना समान हक्क दिले आहेत. तरीही समाजात अजूनही मागासलेले, वंचित घटक आहेत. त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी जागृती आवश्यक असल्याचे प्रतिपादन वरिष्ठ न्यायमूर्ती,उच्च न्यायालय, मुंबई तथा कार्यकारी अध्यक्ष,महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई श्री.ए.ए.सय्यद यांनी आज नागोठणे येथे केले.

     महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि रायगड जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवा महाशिबीर व शासकीय सेवा, योजनांचा महामेळावा रोहा तालुक्यातील नागोठणे येथील रिलायन्स पेट्रोकेमिकल्स टाउनशिप मधील बालगंधर्व रंगभवन सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

    यावेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर,महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई चे सदस्य सचिव श्री.दिनेश सुराणा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती विभा इंगळे, न्यायाधीश अशोककुमार भिलारे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, जिल्हा सरकारी वकील भूषण साळवी, सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, विविध शासकीय विभागांचे कार्यालयप्रमुख, तालुका बार कौन्सिलचे अध्यक्ष, वकील, विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी यांची उपस्थिती होती.

     न्यायमूर्ती ए.ए.सय्यद पुढे म्हणाले, देशहितासाठी समाजातील सर्वच स्तरांची सर्वांगीण प्रगती होणे आवश्यक आहे. प्रत्येक वंचित घटकास, मागासलेल्या व्यक्तीस त्याच्या अधिकाराची, हक्काची जाणीव होणे गरजेचे आहे. त्यासाठी जनजागृती करणे महत्त्वाचे असून यासाठीच तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विधी सेवा प्राधिकरण कार्य करीत आहे. वंचितांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण प्रयत्नशील आहेत. आजच्या या विधी सेवा महाशिबीर तसेच शासकीय सेवा व योजनांच्या महामेळाव्याच्या माध्यमातून जनतेत, वंचित घटकांत त्यांचे हक्क,कर्तव्य तसेच जबाबदारी याबाबत जनजागृतीचा प्रयत्न केला जात आहे. अशा शिबिरांच्या माध्यमातून देशभरातून आतापर्यंत दररोज 40 लाख लोकांपर्यंत विधी सेवांची तसेच विविध शासकीय योजनांची सेवांची माहिती जनतेपर्यंत पोहोचत आहे. हे काम असेच अविरत सुरू राहील, असेही ते शेवटी म्हणाले. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व विविध शासकीय विभागांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाबाबत न्यायमूर्ती ए.ए. सय्यद यांनी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे विशेष कौतुकही केले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आपल्या मनोगतातून प्रशासनाने वंचितांना विविध शासकीय दाखले देण्यासाठी घेतलेल्या शिबिरांबाबत, जिल्ह्यात राबविण्यात येत असलेली लसीकरण मोहीम, ऑक्‍सिजन निर्मितीतील रायगड जिल्ह्याचे महत्वपूर्ण योगदान, कोविडच्या तिसऱ्या लाटेची जिल्हा प्रशासनाने केलेली पूर्वतयारी यासह रायगड जिल्ह्याच्या वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांची माहिती दिली. त्याचप्रमाणे येत्या काळातही लोकाभिमुख, पारदर्शी, जनतेला हितकारक असे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोहा प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, तहसिलदार कविता जाधव, प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसिलदार सचिन गोसावी, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, तहसिलदार विशाल दौंडकर, तहसिलदार सचिन शेजाळ, विविध शासकीय विभागांचे कार्यालयप्रमुख व त्यांचे कर्मचारी, रिलायन्सचे वरिष्ठ अध्यक्ष अविनाश श्रीखंडे,अध्यक्ष शशांक गोयल, उपाध्यक्ष चेतन वाळंज तसेच रिलायन्स इंडस्ट्रीज, नागोठणे, वरिष्ठ व्यवस्थापक रमेश धनावडे, अजिंक्य पाटील, श्रीकांत राजहंस त्याचप्रमाणे स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन यांचे बहुमोल सहकार्य लाभले.