पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ची आढावा बैठक संपन्न

0
90

 पनवेल  : शुक्रवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक काँग्रेस भवन येथे संपन्न झाली. माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत जिल्हा कमिटी चे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत सह प्रभारी दीपक शर्मा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भाई आर सी घरत यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या प्रास्ताविकपर भाषणात ते म्हणाले की केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने कृत्रिमरित्या महागाई वाढवून देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे.यासाठीच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार तसेच प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिनापासून ते 29 नोव्हेंबर पर्यंत राज्यभर जनजागरण अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात पदयात्रा काढून कृत्रिम महागाईचा निषेध करण्यात येणार आहे. तसेच गावखेड्यात जाऊन दुर्गम वस्त्यांवर जाऊन केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाबाबत कार्यकर्ते नागरिकांना अवगत करतील.
हुस्नबानू खलिफे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की सगळ्यांनी एकदिलाने काम करणे गरजेचे आहे.जनजागरण अभियान राबविताना जास्तीत जास्त कार्यकर्ते जोडणे हेदेखील आपल्याला पाहायचे आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात पदाधिकार्‍यांची उपस्थिती पाहून मला फार आनंद झाला. आजची सभा कार्यालयात झाली याच्या पुढची हॉलमध्ये होईल आणि त्याच्या पुढच्या सभेला मैदान घ्यावे लागेल असा मला विश्वास वाटतो.
हुस्नबानू खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीला सह प्रभारी दीपक शर्मा,पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष आर सी घरत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष कॅप्टन कलावत,ज्येष्ठ नेते जी आर पाटील, माजि रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष अनंत पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महिला सेल सदस्य निर्मला म्हात्रे, जिल्हा मागासवर्गीय सेल अध्यक्ष माया अहिरे, पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष अरविंद सावळेकर,जिल्हा सरचिटणीस मल्लीनाथ गायकवाड, जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष वैभव पाटील, उत्तर रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस डॉक्टर सेलचे उपाध्यक्ष डॉक्टर अमित भक्तिकुमार दवे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस कमिटी सरचिटणीस आदित्य सावळेकर, पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती वसंत काठावले, माजी नगरसेविका शशिकला सिंग,रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष गणेश म्हात्रे,माजी नगरसेवक लतीफ शेख यांच्या सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.