पनवेल शासकीय विश्रामगृह समस्यांच्या विळख्यात

0
111

सर्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

पनवेल : पनवेल शहराजवळून जाणार्‍या पंचमुखी मारुती मंदिराजवळ असलेले शासकीय विश्रामगृह हे सध्याच्या स्थितीला अनेक समस्यांच्या गर्तेत असून येथे येणार्‍या मंत्री, आमदार, खासदारांसह शासकीय अधिकार्‍यांना वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मुंबईकडून पुण्याच्या दिशेने किंवा कोकणात जाण्यासाठी महामार्गालगत असलेले शासकीय विश्रामगृह हे अनेकांचे विश्रांती घेण्याचे ठिकाण होते. अनेक केंद्रीय व राज्यमंत्री तसेच विविध आमदार, खासदार, शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार येथे थांबतात. कित्येक वेळा शासकीय बैठकाही होतात. पत्रकार परिषदही होतात. परंतु गेल्या काही वर्षापासून या शासकीय विश्रामगृहाकडे सार्वजनिक बांधकाम विभाागाने पूर्णतः दुर्लक्ष केल्याने पुर्वीची असलेली रया आता निघून गेली आहे. याची बांधणी साधारण 1910 च्या सुमारास झाली आहे. अत्यंत जुने बांधकाम व त्या काळात असलेले लाकूड, दगडे व इतर साहित्याच्या माध्यमातून येथे उभारणी करण्यात आली आहे. दोन व्हीआयपी कक्ष, सभागृह व साधी निवासस्थान व मागील बाजूस शौचालय, बाथरुम व किचन अशा स्वरुपाचे हे विश्रामगृह असले तरी या विश्रामगृहाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी लाकूड व भिंतीला वाळवी लागली आहे. बैठकांचे कुशण निघाले आहेत. चादरी, उशांची अभ्रे फाटलेली आहेत. त्यात ढेकुणांचा सुळसुळाट आहे. तसेच सभागृहात असलेल्या खुर्च्या सुद्धा गायब झाल्या असून राष्ट्रीय नेत्यांचे फोटो सुद्धा धुळखात पडले आहेत. या ठिकाणी असणारे खानसामे सुद्धा आजारी अवस्थेत असल्याने येथे आवश्यक असणारी कुठलीही सोयी सुविधा उपलब्ध नाही आहे. कोकण तसेच घाट माथ्यावर जाणार्‍या मार्गावरील मुख्य विश्रामगृह असल्याने त्याची जास्तीत जास्त चांगली सोयी सुविधा व उभारणी होणे गरजेचे असतानाही सार्वजनिक बांधकाम खात्याकडून थातुरमातूर कामे केली जात असल्याने येथे येणारे संताप व्यक्त करीत आहेत. पनवेल आज चोहोबाजूने वाढत असल्यामुळे शासकीय विश्रामगृह सुद्धा चांगल्या पद्धतीचे व सर्व सोयीसुविधायुक्त असणे गरजेचे असतानाही या ठिकाणी संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने सर्वांनी नाराजी व्यक्त केली आहे.