खोपोली – खोपोली व खालापूर तालुक्यातील नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी, यासाठी जेष्ठ पत्रकार पहिलवान हनुमंतराव ओव्हाळ अनेक वर्षापासून संघर्षरत आहेत. आंदोलन, मोर्चे व निवेदनाच्या माध्यामातून ते शासकीय रूग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दोन महिन्यापूर्वी आंदोलन केल्यानंतर रूग्णालयाच्या कामाला वेग आला होता, पण पुन्हा काम थंडबस्त्यात गेल्याने दि. 30 नोव्हेंबरपासून रायगड संघर्ष समिती तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, खालापूर येथील दहिवली बोरोटी या जागेत मंजूरी मिळाल्यानंतर रितसर मोजणी होऊनही शासनाकडून विलंब होत आहे. यासोबतच सुभाषनगर (खोपोली) येथे संरक्षण भिंत होण्याबाबत अनेक वेळा उपोषण करुन देखील शासनाचे व प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शिळफाटा येथील ट्रामा सेटर दवाखाना अनेक वर्षे महिन्यांपासून धुळखात पडला आहे. ताकई रोड आरसीसी काम एमएमआरडीच्या तर्फे खोपोलीनगर परिषदेच्या वतीने अनेक महिन्यांपासून सुरु असताना प्रगती दिसत नाही, या सर्व विषयांकडे लक्ष वेधण्यासाठी दि. 30 नोव्हेंबरपासून रायगड संघर्ष समिती तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे. शासकीय रुग्णालय होण्यासाठी जेष्ठ पत्रकार पहिलवान हनुमंतराव ओव्हाळ, गोपीनाथ सोनवणे, खलिल सुर्वे, सतिष रावळ, माजी नगरसेवक राजु डूमने यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संघर्ष समितीच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर सकाळी 11 वाजता उपोषणाला बसण्याचा निर्णय घेण्यात आला.