पनवेल : पनवेल महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर महानगरपालिका हद्दीतील प्रत्येक विभागात विकासकामे करून शहरांसोबत गावांचा विकास करण्याचा संकल्प करण्यात आला. त्यानुसार महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणाऱ्या तब्बल ३१ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आज (दि. १५) झाले आहे.
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, सुशिला घरत, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, बबन मुकादम, मनोहर म्हात्रे, राजू सोनी, मनोज भुजबळ, अजय बहिरा, तेजस कांडपिळे, नगरसेविका दर्शना भोईर, चारुशीला घरत, रुचिता लोंढे, निलेश बाविस्कर, माजी नगरसेवक श्रीकांत ठाकूर, सुहासिनी शिवणेकर, ज्येष्ठ नेते सी. सी. भगत, अतुल पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, यांच्यासह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
पनवेल परिसराचा झपाट्याने विकास होत असताना शहरांसोबत गावांचा विकास करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीने पनवेल नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत झाले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी नगराध्यक्ष असल्यापासून ते आता हॅट्रिक आमदार म्हणून काम करताना पनवेलच्या विकासात मोठी भर टाकली, त्यांच्यामुळे पनवेल विधानसभा श्रेत्रात खऱ्या अर्थाने विकासाचे पर्व आले. शहरांच्या बरोबर गावांचा विकास करण्यासाठी दूरदृष्टिकोनातून महानगरपालिकेची स्थापना झाली आणि विकासाला आणखी वेग आला. नागरिकांना अपेक्षित व शाश्वत विकास करण्याचे काम पनवेल महानगरपालिकेतील सत्ताधारी करताना दिसत आहेत. या कामासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सभागृहनेते परेश ठाकूर आणि लोकप्रतिनिधी सतत कार्यरत असतात. त्या अनुषंगाने पनवेलच्या विकासाचा आलेख उंचावत आहे. त्यामुळे नागरिकांकडून वाहवा मिळत आहे.
आज झालेल्या कार्यक्रमात प्रभाग क्रमांक १४ मधील साईनगर रस्ता काँक्रीटीकरण करणे(अंतिम भूखंड क्रमांक १८ ते सर्वे ७९७- पनपा पाण्याची टाकी ते गणेश मंदिर ते ला-मेर कॉम्प्लेक्स), आदर्श को ऑप हौसिंग सोसायटी लि. मधील अंतर्गत रस्ते व अंतिम भूखंड क्रमांक ३५ ते किनारा सोसायटी पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक १८ मधील महानगरपालिका अग्निशमन केंद्र इमारत ते डॉ. मौलाना आझाद चौकापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, छत्रपती संभाजी महाराज मैदान विकसित करणे, प्रभाग १९ मधील अंतिम भूखंड क्रमांक १२७ अ ते १२४/२ ते अंतिम भूखंड क्रमांक १३९ ते म्हात्रे हॉस्पिटल ते अंतिम भूखंड क्रमांक १४२ व श्री कोटीभास्कर (वृंदावन हॉटेल ) ते हरी काणे यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, कृष्णाळे तलाव लगतचा (डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील पुतळ्यापासून बालाजी मंदिर ते कर्नाळा सर्कल पर्यंत) व सहयोग नगर मधील टी आकाराचा रस्ता काँक्रीटीकरण करणे, उरण रोडवरील श्री. संताजी महाराज जगनाडे चौक ते लक्ष्मी आय इन्स्टिटयूट पर्यंत आर. सी. सी. नाला बांधणे, टिळक रोड ते महात्मा फुले रोड जोडणारा तथास्तु हॉल समोरील रस्त्यांमध्ये दोन्ही बाजूस गटार बांधणे व रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक २० मधील पोदी भागांमध्ये मलनिःस्सारण वाहिन्या टाकणे, पोदी भागांमध्ये अंतर्गत गटाराचे बांधकाम करणे, तक्का गाव येथे मलनिःसारण वाहिन्या टाकणे, तक्का गावामध्ये अंतर्गत गटाराचे बांधकाम करणे, काळुंद्रे येथे मलनिःसारण वाहिन्या टाकणे, भिंगारी गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गटाराचे बांधकाम करणे या जवळपास ३१ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन झाले. या कामांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे, त्यामुळे नागरिकांकडून लोकप्रतिनिधींचे आभार व्यक्त केले जात आहे.