महापालिका क्षेत्रात 15 ते 18 वयोगटातील लसीकरणास सुरूवात

0
338

पनवेल : कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर 15 ते 18 वयोगटातील मुलां-मुलींचे कोरोना प्रतिबंधक लसीकरणास आज पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सुरूवात झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने के.वी कन्याप्रशाला, पनवेल येथे करण्यात आले. याच बरोबर पालिका क्षेत्रातील चारही प्रभागातील विविध दहा शाळांमध्येही लसीकरणास सुरूवात झाली. पहिल्या दिवशी दहा शाळांमध्ये जवळपास ५ हजार विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.
यावेळी महापौर डॉ.कविता किशोर चौतमोल, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी तसेच आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त सचिन पवार, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, शिक्षण विभागाचे प्रशासकिय अधिकारी बाबासाहेब चिमणे, वैद्यकिय अधिकारी रेहाना मुजावर तसेच शाळेचे पदाधिकारी,शिक्षक ,परिचारिका, विद्यार्थी उपस्थित होते.
हे लसीकरण करण्यास पनवेल महापालिक सज्ज झाली असून शिक्षण विभागाच्या मदतीने 230 शाळांमध्ये जाऊन लसीकरण करण्यात येत आहे. नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1,2,3,4,5,6 अंतर्गत प्रत्येक शाळांचे दिनांक आणि वार निहाय वेळापत्रक करण्यात आले आहे. या वेळापत्रकानूसार त्या त्या शाळांमध्ये लसीकरण होणार आहे. दररोज 10 शाळांमध्ये लसीकरणासाठी 10 पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात एक डॉक्टर, परिचारिका,रूग्णवाहिका असणार आहेत. सर्व शाळांचे येत्या आठ –दहा दिवसात हे लसीकरण पुर्ण करण्याच्या दृष्टीने महापालिकेने नियोजन केले आहे.
महापालिकेच्यावतीने १५-१८ वयोगटातील रोज होणारे लसीकरणाचे सेशन ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महापालिकेच्यावतीने समाजमाध्यमावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रेस नोट मध्येही रोजच्या लसीकरणाची माहिती देण्यात येणार आहे.
पनवेल महापालिका हद्दीत सुमारे 40 हजार मुले आहेत. त्यांच्या पालकांनी प्रसिध्द केलेल्या आठवड्याच्या नियोजनातील शाळेतील विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी. जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी मुलांना लस देण्यासाठी शाळेला परवानगी द्यावी आणि ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.