पनवेल:
शहरातील रस्त्याच्या मधोमध असणारे तसेच पादचारी मार्गाला अडथळा ठरणारे विजेचे खांब धोकादायक ठरत आहेत. रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या धोकादायक विजेच्या खांबांमुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. या अनुषंगाने सदरचे धोकादायक विजेचे खांब हटवण्याची तसेच रस्त्यावरील उघड्या गटारांवर झाकणे बसवण्यात यावीत, अशी मागणी पनवेल तालुका युवासेनेच्यावतीने महापालिकेकडे करण्यात आली आहे. युवासेना पनवेल विधानसभा अधिकारी पराग मोहिते यांनी याबाबत पालिकेला निवेदनही दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हंटले आहे की, पनवेल शहरातील अनेक रस्त्यांचे कोविड काळानंतर महापालिकेच्या माध्यमातून नुतनीकरण तसेच दुरुस्तीकरण करण्यात आले आहे. मात्र हे दुरुस्तीकरण व नूतनीकरण होत असताना रस्त्यावरील अनेक जुने विजेचे खांब न हटवता ते जसेच्यातसे रस्त्याच्यामधोमध उभे आहेत. यासोबतच काही रस्त्यांचे बरेचसे काम पुर्ण झालेले असले तरी त्या रस्त्यांच्या बाजूला असलेल्या गटारांवर पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी झाकणे बसवण्यात आलेली नाहीत. या दोन्हीही कारणांमुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. यामुळे अनेक अपघाताचे प्रसंग घडतात, तर छोट्यामोठ्या इजा सातत्याने होत असतात. परंतु अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे आढळून येत आहे. याकारणाने आम्ही शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, युवासेना सचिव तथा कॉलेज कक्षप्रमुख वरुण सरदेसाई यांच्या आदेशानुसार युवासेना विस्तारक, सहसचिव ओंकार चव्हाण यांच्या सुचनेनुसार युवासेना पनवेल विधानसभा अधिकारी पराग शरद मोहिते यांनी आयुक्तांकडे या विषयाची गांभिर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना करण्यासंदर्भात तसेच दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई कराण्यासंदर्भात निवेदन देत मागणी केली आहे.