पोलीसाचा विवाहीत महिलेवर बलात्कार

0
321

पेण पोलिसांनी केली अटक ; चार जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी

श्याम जाधव पोलीसाने केली पोलीस ठाण्यात पोलिसांनाच मारहाण

पेण-
पोलीस असल्याचा गैरफायदा घेत पती व मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन विवाहीत महिलेशी तिच्या संमती शिवाय मागील सहा वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल शाम जाधव याच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेण पोलिसांनी आरोपी शाम जाधव याला अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले असता त्याला चार जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अलिबाग येथील मुख्यालयात कार्यरत असलेला पोलीस कॉन्स्टेबल शाम जाधव (रा.शिवाजी नगर ,रामवाडी ,पेण) याने पोलीस असल्याचा फायदा घेत पेण शहरातील एका विवाहित महिलेला तिच्या पतीला व मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन 2015 पासून आज पर्यंत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले असल्याची तक्रार या महिलेने पेण पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री दाखल केली आहे. त्यानुसार पेण पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस शाम जाधव याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नं. 01/ 2022 भा.द.वि. कलम 376 (1 ), 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शाम जाधव याला पेण पोलिसांनी अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास चार जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलीसाने केली पोलीस ठाण्यात पोलिसांनाच मारहाण
आरोपी शाम जाधव याच्या विरोधात सदर महिला पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेली असता या महिलेची फिर्याद एकूण घेत असताना आरोपी शाम जाधव याने पेण पोलीस ठाण्यात जाऊन गोंधळ घातला. ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस नाईक व महिला पोलीस उप निरीक्षक घाडगे यांना शिवीगाळ केली. यावेळी ड्युटीवर असलेले पोलीस नाईक गुजराथी व पोलीस शिपाई मढवी हे समजावण्यासाठी गेले असता त्यांना देखील शिवीगाळ करुन हाताबुक्क्याने मारहाण केली. तसेच शाम जाधव याला तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी आलेले पोलीस शिपाई जाधव याना शिवीगाळ करुन लाथेने मारहाण केली व गुजराथी यांच्या कानाखाली मारली. या याप्रकरणी देखील आरोपी शाम जाधव याच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी भा.द.वि. कलम 353 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस निरिक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलिस अधिक तपास करीत आहेत.
माथेरान मध्येही केली होती पत्रकारासोबत दादागिरी
श्याम जाधव पाच महिन्यांपूर्वी माथेरान पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना रात्रीच्या वेळेत टपरी बंद झाल्यानंतर पान दिले नाही म्हणून टपरी मालकाला शिवीगाळ करत मारहाण केली होती. यावेळी सदर वाद सोडविण्यासाठी पत्रकार गेले असता त्यांच्या बरोबरही दादागिरी केली होती