सर्वपक्षीय नेत्यांनी शोकसभेला उपस्थित राहून वाहिली आदरांजली
पनवेल :
थोर विचारवंत, शिक्षणतज्ञ, शेतकरी कामगार पक्षाचे मा.सरचिटणीस, रयत शिक्षण संस्थेचे मा.चेअरमन, मा.सहकार मंत्री, मा.विरोधी पक्षनेते प्रा. एन. डी.पाटील यांचे १७ जानेवारी रोजी निधन झाले. या पार्श्वभूमीवर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पनवेल – उरण शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले. या शोकसभेत शेतकरी कामगार पक्षातील दिग्गज नेत्यांसह सर्वपक्षीय नेत्यांनीही उपस्थित राहून श्रध्दांजली अर्पण केली.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे कोकण शिक्षक मतदार आमदार बाळाराम पाटील, पनवेल नगरपालिकेचे माजी आदर्श नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील, काँग्रेसचे महेंद्र घरत, नारायणशेठ घरत, रामदास शेवाळे, हेमराज म्हात्रे, ॲड. प्रमोद ठाकूर, ॲड. सुरेश ठाकूर, जी.आर.पाटील, भाजपचे जयंत पगडे, अमरीश मोकल, शंकरशेठ म्हात्रे, काशिनाथ पाटील, प्रितम म्हात्रे आदींसह पनवेल महापालिका नगरसेवक, नगरसेविका, तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहिले होते.
यावेळी आदरांजली अर्पण करताना आ.बाळाराम पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या जडणघडण मध्ये प्रा.एन.डी.पाटील यांचे मोठे योगदान राहिले आहे. एन. डी.पाटील सर हे आपल्यासोबत कायम राहणार आहेत, कारण त्यांचे विचार, त्यांची चळवळ ही आजही आपल्या सोबत आहे आणि यापुढेही राहणार आहे. एन. डी.पाटील सर जरी शेतकरी कामगार पक्षाचे असले तरीही सर्वपक्षीय राजकारणात त्यांचे महत्वाचे अस्तित्व राहिले होते. एन. डी.सरांनी शैक्षणिक क्षेत्रातही उत्तम कार्य तर केलंच आहे, मात्र या प्रत्येक क्षेत्रातील बारीकसारीक चुकांच्या दुरुस्त्याही त्यांनी करण्यास भाग पाडले. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सरांसोबत काम करण्याचे भाग्य लाभले होते. रयत शिक्षण संस्था ज्या डोलाने उभी आहे त्याचे मोठे श्रेय हे सरांचेच आहे. सरांनी आदिवासी विभागातून शाळांची उभारणी केली, मात्र आर्थिक अडचण समोर होती, त्यावेळी त्यांच्या आवाहनाला त्यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्ह्याच्या शेकापच्या सेवकांनी, कार्यकर्त्यांनी तब्बल एक कोटी ४० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. कोणताही लढा असला तर त्या लढ्यात एन. डी.सर आले की तो लढा यशस्वीच व्हायचा असेही सांगताना या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले की, आमचे राजकारणाचे बाळकडू हेच मुळात एन.डी.पाटील यांच्या भाषणांमधून आम्हाला मिळाले. त्यांनी आपली भाषणे वैचारिकरित्या, अभ्यासपूर्ण असायची. त्यांनी नेहमीच कवितेच्या आधाराने उपस्थितांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचे. ८४ च्या लढ्यात आमचे सर्व नेते जेलमध्ये गेले आणि त्यावेळी शरद पवार यांच्या मदतीने संपूर्ण महाराष्ट्र बंद करण्याची ताकद एन. डी.पाटील सरांमध्ये होती. एन. डी.पाटील म्हणजे विचारांच्या माळेतील शेवटचा मणी निखळला, असल्याचंही घरत यांनी आदरांजली वाहताना सांगितले. ॲड.प्रमोद ठाकूर यांनी बोलताना सांगितले की, एन. डी.सर म्हणजे विज्ञाननिष्ठ, तत्वनिष्ठ म्हणून तारा महाराष्ट्राने गमविला असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. यावेळी भाजपचे शहरप्रमुख जयंत पगडे यांनी आदरांजली वाहताना सांगितले की, एकही क्षेत्र असे नाही की या क्षेत्रात सरांचे योगदान अमूल्य आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक हा सिमाप्रश्न त्यांनी समोर आणला, आणि तो लढा लढला. साधी राहणी जरी असली तरी विचारसरणीने खूप विद्वान असे ते होते.
यावेळी शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख रामदास शेवाळे यांनी आदरांजली वाहताना सांगितले की, एन. डी.पाटील साहेबांबाबत बोलण्याईतका मी मोठा नाही. ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण वाचतो आणि आपल्या पुढच्या पिढीला वाचन करण्यास सांगतो, असे इतिहास घडविणारे नेते होते. असे नेते पुन्हा होणार नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक सतीश पाटील यांनी सांगितले की, ६० – ७० च्या काळात शेकापचे नेते अधिवेशनापूर्वी होणाऱ्या बैठकीत आक्रमक असायचे, मात्र या आक्रमकतेला शांतपणे विचार करण्यास लावणारे एन. डी.पाटील आणि गणपतराव देशमुख होते. शेतकरी कामगार पक्षाला मिळालेली चळवळ म्हणजे एन. डी.पाटील साहेब होते.
काँग्रेसचे जी.आर पाटील यांनी बोलताना सांगितले की, एन. डी.पाटील सर लढले ते म्हणजे अनेक चुकीच्या प्रवृत्तीला विरोध करत चांगल्या प्रवृत्तीचे समर्थन करीतच. देशाला दोन रत्ने मिळाली ती म्हणजे, एक बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. आणि या भाऊरावांनी दोन रत्ने दिली त्यातले एक म्हणजे एन. डी.पाटील सर होते. अंबानीसारख्या बलाढ्य धनदांडग्यांच्या घशात पनवेलमधील १०० एकर जमीन घालण्याचे काम तत्कालीन राज्य सरकारने केले होते. ६५ – ७० च्या काळातील हा लढा ते लढले आणि अंबानी सारख्याला माघार घेण्यास भाग पाडणारी चळवळ म्हणजेच एन. डी.पाटील हे होते. एक गरिबांचा नेता म्हणून त्यांनी मोठे काम केलं. १३ हजार शाळा बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाला रद्द करण्यासाठी त्यांनी भाग पाडले. एन. डी.पाटील म्हणजे गोरगरिबांचे, शेतकऱ्यांचे दैवत होते आणि आज ते आपल्यातून हरपले असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी बोलताना सांगितले की, ज्यावेळी महाराष्ट्रात काहीतरी वेगळं घडत त्यावेळी महान नेते एकवटतात त्यातले एक नेते म्हणजे एन. डी.पाटील होते. एन. डी.पाटील आणि दिबा पाटील साहेबांना श्रद्धांजली अर्पण ही भाषणे करून नाही तर त्यांचे विचार, त्यांची स्वप्ने पूर्ण करून करणे गरजेची असल्याची भावना बबनदादा पाटील यांनी व्यक्त केली.