वावंजे प्राथमिक आरोग्य केंद्राला लिंडे कंपनीकडून रुग्णवाहिकेची भेट

0
254
पनवेल : पनवेल तालुक्यातील वावंजे प्राथमिक आरोग्य केंद्राला प्रजासत्ताक दिनी रुग्णवाहिकेची भेट देण्यात आली आहे. तळोजा औद्योगिक वसाहतीतील लींडे कंपनीच्या सी एस आर फंडातून ही रुग्णवाहिका देण्यात आली. शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील आणि रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिताताई पारधी यांच्या प्रमुख उपस्थितीत या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना काशिनाथ पाटील म्हणाले की तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये जवळपास दोन लाख कामगारांना रोजगार मिळत असतो. या ठिकाणी असणाऱ्या कित्येक कंपन्यांच्यात आम्हा पुढाऱ्यांना जाण्याची कधी संधी देखील मिळत नाही. लींडे या कंपनी व्यवस्थापना सोबत माझा यापूर्वी कुठलाही परिचय नव्हता. परंतु कोरोनाविषाणू च्या दुसऱ्या लाटेमध्ये जेव्हा वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला तेव्हा ही कंपनी तो ऑक्सिजन बनवत असल्याचे समजले. आज या ठिकाणी कंपनी व्यवस्थापनाचे आणि त्यांच्या तमाम कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो कारण त्यांनी प्रचंड कष्ट घेऊन वैद्यकीय ऑक्सिजन निर्माण केला व तो महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील हॉस्पिटल्सना देखील पुरवला. वावंजे प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका ही जुनी झाली होती त्यामुळे तिच्या देखभाल व दुरुस्तीचा खर्च करणे देखील अवघड होऊन बसले होते. या कंपनीने योग्य वेळी योग्य भेट प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली आहे. परिसरातील नागरिकांसाठी ही रुग्णवाहिका लाभदायी ठरेल.
सरपंच डी बी म्हात्रे म्हणाले की कंपनी व्यवस्थापनाने प्रस्ताव जाताच तातडीने त्याला होकार दिला व आज प्रजासत्ताक दिनी रुग्णवाहिकेचे लोकार्पण देखील झाले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिताताई पारधी म्हणाल्या की ही रुग्णवाहिका रुग्णांना आणि विशेष करून महिला रुग्णांना जास्त लाभदायी ठरेल. गरोदर मातांना या ठिकाणी रिक्षा अथवा खासगी वाहनांतून आणावे लागते अशा रुग्णांना देखील ही रुग्णवाहिका लाभदायी ठरेल. त्या पुढे म्हणाल्या की जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांना देखील लिंडा कंपनीने दिलेल्या रुग्णवाहिकेचे बद्दल कळविले त्यांनीदेखील कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानत असल्याचा निरोप माझ्याकडे सुपूर्द केला आहे.
कंपनीचे विभागीय व्यवस्थापक एन के पवार यांनी कोरॉना कालखंडात कंपनीने केलेल्या नेत्रदीपक कामगिरी बाबत उपस्थितांना अवगत केले. ते पुढे म्हणाले की समाजाप्रती असलेल्या आमच्या उत्तरदायित्वमध्ये आम्ही कधीही कसूर होणार नाही.जेव्हा-जेव्हा समाजाला कंपनीची गरज लागेल तेव्हा तेव्हा कंपनी सकारात्मक दृष्टीने त्या सगळ्या प्रस्तावांचा विचार करेल. या रुग्णवाहिकेचा वापर येथील ग्रामस्थांना करता येईल याचे आम्हाला समाधान वाटते.
रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिताताई पारधी, लिंडा कंपनीचे विभागीय प्रमुख रंगनाथन, विभागीय व्यवस्थापक एन के पवार, अमरिंदर सिंग, वावंजे ग्रामपंचायतीचे सरपंच डी बी म्हात्रे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राज चव्हाण, आरोग्य सहाय्यक तानाजी जाधव, योगिता गुरव, कनिष्ठ सहाय्यक दत्तात्रेय चोरघे, ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वावंजे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची देखील प्रशंसा करावी लागेल. जवळपास दोन लाख कर्मचारी या औद्योगिक वसाहतीमध्ये येतात. कोरोना विषाणूचे संक्रमणाला थोपविण्यासाठी लस उपलब्ध झाल्यानंतर या प्राथमिक आरोग्य केंद्राने आजूबाजूच्या गावातील नागरिकांचे लसीकरण तर केलेच शिवाय औद्योगिक वसाहतीमधील जवळपास एक लाख कामगारांचे लसीकरण देखील या केंद्राच्या माध्यमातून झाले आहे. – काशिनाथ पाटील.